नांदेड-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव 2025 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने चार पारितोषिके पटकावून उल्लेखनीय ठसा उमटविला. शास्त्रीय तालवाद्य स्पर्धेत विद्यापीठातील विद्यार्थी ऋषिकेश पांचाळ याने उत्कृष्ट कलाविष्कार सादर करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. प्रहसन (स्किट) या कलाप्रकारात ‘आधुनिक कीर्तन’ या अनोख्या संकल्पनेचे दमदार व प्रभावी सादरीकरण करून संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. यात अभिषेक शिंदे, अभिजीत भड, अजिंक्य होळकर, सुनील खलुले, आदित्य पवार व अनंत खलुले यांच्या अभिनयाने रंगत वाढवली. या महोत्सवात राज्यभरातील २६ विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये विद्यापीठाने सादर केलेले किनवट येथील आदिवासी दंडार नृत्याने स्पर्धेत विशेष ठसा उमटवला. लखन कनाके, प्रथमेश तोडसाम, सुनील खलुले, शिवम सुतार, संकेत जुगनाके, आदित्य पवार, आशिष हंगाम, पंकज मेश्राम, कुरसुंगे ओमकार, तोडसाम रुपेश यांनी उर्जावान, बहारदार आणि तालबद्ध सादरीकरण करून तृतीय क्रमांक पटकावला. वादविवाद स्पर्धेत विद्यापीठाच्या पूजा सुपेकर व कुंडलीक घाटोळ यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता- शाप की वरदान’ या समकालीन विषयावर चिंतनशील अशी मुद्देसूद मांडणी करून परीक्षकांची दाद मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
याशिवाय नाट्य विभागातील एकांकिका, मुकाभिनय व नक्कल या स्पर्धांमध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दर्जेदार सादरीकरण केले. संगीत व ललित कला विभागातही सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या कलाकौशल्याने उपस्थितांची मने जिंकली. या महोत्सवात सर्व कलावंत विद्यार्थ्यांनी अतिशय कमी वेळेत उत्कृष्ट तयारी करून जिद्द, एकनिष्ठता आणि मेहनतीच्या बळावर उत्तम कामगिरी करत विद्यापीठाचा गौरव वाढविला. यामुळेच कमी कालावधीत चांगले यश मिळविता आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, परीक्षा व मूल्यांकन मंडळ संचालक डॉ. हुशारसिंग साबळे, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील व जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी विजयी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.
या यशामागे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. संघाचे मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीप काळे, प्रा. माधुरी पाटील, डॉ. शिवराज शिंदे, श्री. संदेश हटकर, श्री. दिलीप डोंबे, श्री. सिद्धार्थ नागठणकार, डॉ. पांडुरंग पांचाळ, श्री. नवलाजी जाधव, श्री. समाधान राऊत व श्री. राजू सरोदे यांनी केलेल्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी श्री. संभा कांबळे, श्री. बालाजी शिंदे, श्री. जीवन बारसे, तसेच वाहन चालक श्री. रोकडे, श्री. कऱ्हाळे व खयूम शेख यांनी परिश्रम घेतले. स्वारातीम विद्यापीठाने चार पारितोषिकांसह प्रभावी ठसा उमटवत इंद्रधनुष्य युवक महोत्सव 2025 मध्ये यश संपादन केले.
