साईनाथच्या कॉल डिटेल्सवरूनच उघड होणार सत्य?
नांदेड (प्रतिनिधी) : गाडगेबाबा मंदिर, सिडको परिसरात ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भांडणात शुभम भद्रे याचा खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपी साईनाथ सुभाषराव वट्टमवार हा देखील जखमी अवस्थेत आढळून आला होता. घटनेनंतर केवळ अर्ध्या तासात म्हणजेच साडेसातच्या सुमारास तो स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेचा क्रम पाहता, साईनाथ वट्टमवारच्या मोबाईल फोनच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) ची तपासणी झाली, तर या प्रकरणातील अनेक प्रश्नांचे उत्तर मिळू शकते, असे सूत्रांकडून समजते. विशेषत: तो जखमी अवस्थेत असताना आणि दवाखान्यात गेल्यावर त्याने कोणकोणाशी संपर्क साधला होता, याची माहिती यातून समोर येऊ शकते.
घटनेचा क्रम
मिळालेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता शुभम भद्रे, चिकू वंजारे, रितेश माळी पाटील आणि इतर काही युवकांमध्ये डीजे ऑर्डर व पार्टीच्या कारणावरून वाद झाला. वादाच्या दरम्यान साईनाथ सुभाषराव वट्टमवार (वय १९) याच्यावर ब्लेडने हल्ला करून त्याला गंभीर दुखापत करण्यात आली, असा आरोप आहे.याच घटनेत शुभम भद्रेचा मृत्यू झाला आहे.त्याबाबत खुनाचा आरोप साईनाथ वट्टमवार विरुद्ध आहे.तो गुन्हा दाखल आहे.साईनाथला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्या नंतर शुभम भद्रे (मयत), चिकू वंजारे आणि रितेश माळी पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा क्रमांक 1063/ 2025 दाखल केला आहे.
आरोपी साईनाथ वट्टमवार जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात?
माहितीनुसार, साईनाथ वट्टमवार हा खूनाच्या घटनेनंतर जखमी अवस्थेत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गेला होता. तेथे तो सीसीटीव्ही मध्ये आलाच असासणार ना ! तेथून त्याने जखमेवरील उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात जाण्याचे नांदेड ग्रामीण पोलिसांचे पत्र घेतले, आणि त्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला. साईनाथने उपचार घेऊन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात येणे आवश्यक होते.त्यानंतर सुमारे साडेसात वाजता स्थानिक गुन्हे शाखेने साईनाथ वट्टमवारला ताब्यात घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती काल दिनांक ७ नोव्हेंबर रोजी प्रेस नोटमध्ये देण्यात आली.
सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्ड तपासणीची मागणी
घटनेच्या वेळेतील सीसीटीव्ही फुटेज, तसेच साईनाथ वट्टमवारच्या फोन कॉल रेकॉर्ड्सची तपासणी झाल्यास, त्याने जखमी अवस्थेत कोणाकोणाशी संपर्क साधला आणि घटनास्थळानंतर तो नेमका कुठे गेला, हे स्पष्ट होईल.सध्या या प्रकरणाचा तपास नांदेड ग्रामीण पोलीस करत असून, सत्य परिस्थिती स्पष्ट होण्यासाठी तपास अधिक खोलात नेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
