देविदास वाघमारे यांच्या‘शिळ्या भाकरी’काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन
कंधार –‘शिळ्या भाकरी’ हा काव्यसंग्रह शिक्षणाचे महत्व सांगणारा आणि विद्रोहाची जाणीव करुन देणारा काव्यसंग्रह आहे. आधुनिक काळात हा काव्यसंग्रह सर्वसामान्य लोकांना प्रेरणा आणि उर्जा देईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम शाळा प्रवेश दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी विद्यामंदिर, कंधार येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक देविदास वाघमारे यांच्या ‘शिळ्या भाकरी’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी, दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सिध्दार्थनगर, कंधार येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख भाष्यकार म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे व कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक तथा सेवानिवृत्त प्राचार्य माधव जाधव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी काॅलेजचे मराठी विभागाचे प्रमुख प्रो.डाॅ.दिलीप सावंत, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, कवयित्री रुपाली वैद्य-वागरे, कवयित्री ज्योती परांजपे, प्रसिद्ध कवी प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त मुख्याध्यापक देविदास वाघमारे यांनी करुन ‘शिळ्या भाकरी’ काव्यसंग्रह लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘शिळ्या भाकरी’ या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.
‘शिळ्या भाकरी’ या काव्यसंग्रहावर भाष्य करताना प्रज्ञाधर ढवळे म्हणाले, देविदास वाघमारे यांचे गुराख्यापासून गुरुजी हे पहिले, तर शिळ्या भाकरी हे दुसरे साहित्य अपत्य आहे. शिळ्या भाकरी हा काव्यसंग्रह प्रचंड वेदना मांडणारा आणि काळजाला भिडणारा आहे. देविदास वाघमारेंनी परंपरेला छेद देऊन कवितांची उत्कृष्ट मांडणी केली आहे. यात प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आणि परिवर्तन घडविणाऱ्या कवितांचा समावेश आहे. शिक्षण आणि विद्रोहाची जाणीव यांचा संबंध शिक्षण व्यक्तीला विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि अन्यायाविरुद्ध लढण्यास शिकवते. हे केवळ ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया नाही, तर आत्मसन्मान, हक्कांची जाणीव आणि निर्भयतेची भावना वाढवणारे एक शक्तिशाली साधन आहे. शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये चारित्र्यशक्ती आणि इतरांबद्दल सहानुभूती निर्माण होते, ज्यामुळे ती सामाजिक बदलासाठी लढण्यास प्रवृत्त होते, असेही ते म्हणाले.
या कवितासंग्रहाच्या प्रकाशनानंतर कविसंमेलन पार पडले. या कविसंमेलनाच्या अध्यक्षा कवियत्री प्रतिभा पांडे हे होत्या. यावेळी माधव जाधव, नागोराव डोंगरे, रुपाली वागरे-वैद्य, ज्योती परांजपे-करवंदे, प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ.दिलीप सावंत, अनुरत्न वाघमारे, प्रज्ञाधर ढवळे, अलका मुगटकर, भाग्यश्री आसोरे, ज्योती लाभशेटवार, अंजली हिंगोले, नाना गायकवाड, देवीदास वाघमारे, रोहिणी कांबळे, प्रकाश ढवळे, भगवान अमलापूरे, वैजनाथ कांबळे, जीजाबाई गायकवाड, ॲड.प्रशांत कांबळे आदी कवींनी एकापेक्षा एक बहारदार कवितांचे सादरीकरण करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष रामराव पवार, कंधार तालुका अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड.उत्तम लुंगारे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र ढवळे, अंकुर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप पांगरीकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रोहिदास वाघमारे, ग्रो अॅड् ग्लो पब्लिक स्कुलचे संचालक शंतनु कैलासे, रमाई गॅस सर्व्हिसचे मॅनेजर तुकाराम गायकवाड, औषध निर्माण अधिकारी दिलीप कांबळे, अॅड.जी.पी.गवाले, ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ कांबळे, प्रा.राजूरकर, दिपक कांबळे, अॅड.सिध्दार्थ वाघमारे, अॅड.तथागत वाघमारे आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सी.डी.कांबळे यांनी केले. तर आभार सेवानिवृत्त मुख्याध्यापक देविदास वाघमारे यांनी मानले. जाणीव अस्मितेची साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्यतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
