नांदेड(प्रतिनिधीस)-वासरी,शंखतिर्थ ता.मुदखेड येथे मुदखेड पोलीसांनी छापा टाकून अवैधरित्या वाळू उपसा करण्याचे साहित्य 60 लाख रुपये किंमतीचे जप्त केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजेच्यासुमारास वासरी, शंखतिर्थ येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुदखेड पोलीसांनी तेथे छापा टाकला. तेथे प्रत्येकी 7 लाख रुपये किंमतीच्या पाच बोटी असे 35 लाखांचा मुद्देमाल, 2 लाख रुपये किंमतीचे तीन तराफे, एक वाळू उपसा इंजिन 3 लाख रुपयांचे आणि मोठा फायबर 20 लाख रुपये किंमतीचा असा एकूण 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तराफे जिलेटीनच्या सहाय्याने उडवून जागीच नष्ट करण्यात आले आहेत. या ठिकाणी गुन्हा कोणावर दाखल केला आहे हे मात्र प्रसिध्द पत्रकात लिहिलेले नाही.
अर्धापूरचे उपअविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक धिरज चव्हाण, तहसीलदार आनंद देऊळगावकर, नायब तहसीलदार जगताप, पोलीस अंमलदार कौठेकर, कदम, वानोळे, कारामुंगे आणि श्रृंगारपुतळे यांनी ही कार्यवाही पुर्ण केली.

