नांदेड (प्रतिनिधी) — नांदेड जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, चार पोलीस अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तसेच एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाची पदोन्नती काही महिन्यांपूर्वी झाल्यानंतर आता त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. या बदलांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जारी केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांना एटीबी विभागात बदली करण्यात आली आहे. एटीबी विभागाचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांची बदली उमरी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना किनवट पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून पाठविण्यात आले आहे, तर किनवटचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांना माहूर पोलिस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात नुकतेच आलेले पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना इतवारा पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.
उमरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांची पदोन्नती काही महिन्यांपूर्वीच झाली होती. मात्र त्यांना पदोन्नतीनंतरही उमरी पोलीस ठाण्याचे कामकाज पाहण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांना त्या कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.त्यामुळे कोण आनंदी आणि कोण दुःखी हा विद्यावाचस्पती मिळवण्यासाठी चांगला विषय आहे.
तसेच इतवारा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रमेश गायकवाड यांची बदली काही महिन्यांपूर्वीच झाली होती, तरी ते कार्यरत राहिले होते. परंतु या फेरबदलात त्यांनाही त्यांच्या नव्या बदलीच्या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यमुक्त करण्यात आले आहे.या बदलांमुळे जिल्हा पोलीस दलात हालचालींना वेग आला असून, काही अधिकारी नवीन जबाबदारीमुळे आनंदी आहेत, तर काहींच्या बदलीमुळे नाराजीही व्यक्त केली जात आहे. सध्या मरखेल,हदगाव आणि लिंबगाव या पोलीस ठाण्यांमध्ये आज ही सहाय्यक पोलीस निरीक्षकच प्रभारी म्हणून काम पाहत असल्याने पुढील नियुक्त्या कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे.
