नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे इतवाराच्या प्रांगणात एका महिलेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या माझा महाराष्ट्र या युट्युबचा पत्रकार शेख याहिया आणि त्याचा मुलगा शेख अजहर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा अदखल पात्र असल्याने या गुन्ह्याचा तपास करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली आहे.
दि.2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता एक महिला पोलीस ठाणे इतवारामध्ये आली. ती महिला चालत असतांनाच शेख अजहर शेख याहिया हा तिची व्हिडीओ शुटींग करत होता. ती महिला पोलीस ठाण्याच्या गेटमधून आत आली आणि उजवीकडे वळली.उजवीकडच्या बेंचवर बसून तिने आपल्या शरिरावर डिझेल टाकले. पोलीस ठाणे इतवारा येथे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. बाईची हालचाल पाहुन महिला पोलीस अत्यंत जलदगतीने पळाल्या आणि त्या बाईला आपल्याला आग लावून घेण्यापासून वाचविले. महिला पोलीसांची प्रशंसाच केली पाहिजे. या सर्व प्रकरणादरम्यान व्हिडीओ शुटींग सुरूच होती. त्या महिलेचे नाव रुबीना बेगम मोहम्मद समीर (30) असे आहे. तिचे आपल्या नवऱ्याविरुध्द पोटगी मिळण्याचे प्रकरण सुरू आहे. मुळात या महिलेचा गुन्हा वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. पण तिचा नवरा समीर इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो म्हणून त्याचे पोटगी वॉरंट अंमलबजावणीसाठी इतवारा पोलीस ठाण्यात येत होते. समीर हा परभणीमध्ये राहतो. ही माहिती त्या महिलेने पोलीसांना दिल्यानंतर वॉरंट बजावणी अंमलदार बाबुराव हाटकर यांनी आपल्या स्वत:चे पैसे खर्च करून या महिलेला परभणीला नेऊन समीरवर वॉरंट तामील केले होते. आजपर्यंत समीरने त्या महिलेला 1 लाख रुपये दिले आहेत. पण पुन्हा एकदा नवीन वॉरंट आले.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतवारा पोलीस मदत करत नाहीत म्हणून ही महिला शेख याहिया शेख इसाककडे गेली. त्याने बातमी करण्याची फिस सांगितली म्हणे. काही जण सांगतात ती घेतली पण आणि त्यानेच ही आयडीया दिली की, इतवारा पोलीस ठाण्यात जा तेथे अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाका मी शुटींग करतो आणि बातमी करतो म्हणजे तुम्हाला इतवारा पोलीस मदत करतील. त्या दिवशी पीएसओ ड्युटीवर पोलीस अंमलदार साहेबराव आडे हे होते. त्यांनी या संदर्भाची दिलेली तक्रार इतवारा पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 226, 49 आणि 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 370/2025 प्रमाणे दाखल केली. या गुन्ह्यात शेख याहिया शेख इसाक आणि शेख अजहर शेख याहिया या दोघांचे नाव आरोपी सदरात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार गणेश कोंडेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. हा गुन्हा अदखल पात्र असल्याने या गुन्ह्याच्या पुढील तपासाची परवानगी न्यायालयाने द्यावी म्हणून आज अर्ज सादर करण्यात आला आहे. परवानगी मिळाली तर हा गुन्हा तपासासाठी पोलीस अधिकाऱ्याकडे वर्ग होईल. यापुर्वीसुध्दा शेख याहियाविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 376 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पत्रकार शेख याहिया आणि पुत्र शेख अजहर विरुध्द महिलेला आत्महत्यास प्रवृत्त करण्यासाठी गुन्हा दाखल
