महिला क्रिकेट विश्वचषकाचा इतिहास भारतासाठी नेहमीच संघर्ष आणि प्रेरणेची गाथा राहिला आहे.सन 1973 मध्ये सुरू झालेल्या या प्रवासात भारतीय संघाने अनेक वेळा दमदार कामगिरी केली, पण विश्वविजेतेपद मात्र हाताच्या अंतरावरच राहिले.2005 आणि 2015 मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही, भारताला तो ‘एक विजय’ गवसला नव्हता.पण 2025 या वर्षाने हा इतिहास बदलला.पुरुषप्रधान या खेळात भारतीय महिला क्रिकेट संघाने जिद्द, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर अखेर विश्वचषकावर भारताचे नाव कोरले.हा विजय केवळ मैदानावरचा नव्हत. तो होता संघर्ष, श्रद्धा आणि संयमाच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचा फलश्रुत.
एका छायाचित्रात सामावलेला आदर
सामन्यानंतरच्या उत्सवात एक छायाचित्र संपूर्ण भारतात चर्चेचा विषय ठरले.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आपल्या प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या पायांवर डोके ठेवत आहेत.तो क्षण म्हणजे केवळ आदराचा नव्हता, तर एका दीर्घकाळ दुर्लक्षित प्रतिभेच्या विजयाचा होता.अमोल मुजुमदार मराठी मातीचा सुपुत्र, ज्याने कधी “भारत” लिहिलेली जर्सी घातली नाही,पण ज्याने “भारताला विश्वविजेता” बनवले!
संघर्षातून तेजाकडे
1988 साली सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांनी शालेय क्रिकेटमध्ये 664 धावांची विक्रमी भागीदारी केली,त्या सामन्यात अमोल मुजुमदार फलंदाजीसाठी वाट पाहत राहिले. पण त्यांचा क्रमांक लागला नाही आणि तीच प्रतीक्षा त्यांच्या आयुष्याची कहाणी ठरली.1993 मध्ये रणजी ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात त्यांनी 260 धावांची ऐतिहासिक खेळी केली.लोक म्हणू लागले, “हा पुढचा सचिन ठरेल.”तरीही, भारतीय संघाच्या दारापर्यंत पोहोचूनही ते आत प्रवेश करू शकले नाहीत.171 सामने, 11,167 धावा आणि 30 शतके ही आकडेवारी कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूला अभिमानाने मिरवता आली असती,पण अमोल मुजुमदार यांना ‘टीम इंडियाची’ जर्सी घालण्याची संधी कधीच मिळाली नाही.
वडिलांचे एक वाक्य — जीवनाचा टर्निंग पॉईंट
जेव्हा अमोलच्या मनात निराशेचे ढग दाटले होते, तेव्हा वडिलांनी एकच वाक्य उच्चारले —
“खेळणे बंद करायचे नाही, तुझ्यात अजून क्रिकेट जिवंत आहे.”
हे वाक्य त्यांच्या आयुष्यातील नवा अध्याय ठरले.त्यांनी पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि 2006 मध्ये मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकवून दिली.
याच काळात त्यांनी तरुण रोहित शर्माला प्रथम संधी दिली.आज तोच रोहित भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करत आहे, आणि अमोल मुजुमदार भारतीय महिला संघाचे मार्गदर्शक आहेत.
खेळाडू पासून प्रशिक्षक पर्यंतचा प्रवास
क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर अमोल मुजुमदार यांनी कोचिंगच्या क्षेत्रात पाऊल टाकले.नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि राजस्थान रॉयल्स यांसारख्या संघांसाठी त्यांनी प्रशिक्षक म्हणून यशस्वी भूमिका निभावली.ते असे कोच ठरले, जे केवळ तांत्रिक ज्ञान देत नाहीत,तर खेळाडूंच्या मनात जिद्द आणि आत्मविश्वास जागवतात.2023 मध्ये जेव्हा त्यांची भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली,तेव्हा अनेकांनी शंका घेतली, “ज्याला भारतासाठी खेळता आले नाही, तो संघाला विश्वचषक कसा जिंकवेल?”पण अमोल मुजुमदार यांनी या प्रश्नाचे उत्तर शब्दांनी नव्हे, तर विजयाने दिले.
विश्वचषकाचा तो सुवर्ण क्षण
2025 च्या विश्वचषकात सुरुवातीच्या पराभवानंतर संघावर टीका झाली,
परंतु अमोल मुजुमदार यांनी संघाला स्थिरतेने आणि विश्वासाने उभं ठेवलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्याआधी त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये फलकावर लिहिलं
“We need to get one more.”
(आपल्याला फक्त एक धाव जास्त करायची आहे.)
त्या एका वाक्याने संघात नवा आत्मविश्वास निर्माण झाला.
ऑस्ट्रेलियाने 339 धावांचा डोंगर उभा केला, पण भारतीय महिलांनी 341 धावा करून सामना जिंकला.हा क्षण म्हणजे चक दे इंडियाच्या वास्तव आवृत्तीप्रमाणे होता.
अमोल मुजुमदार — एक प्रेरणादायी वारसा
अमोल मुजुमदार यांनी कधी “भारत” लिहिलेली जर्सी घातली नाही,पण त्यांनी भारताला ती गौरवाची जर्सी परिधान करून दिली.त्यांच्या आयुष्याची कहाणी म्हणजेसंघर्ष, श्रद्धा आणि न थांबणाऱ्या प्रयत्नांची जिवंत प्रेरणा आहे.
“जर्सीवर नाव नसले तरी, हृदयावर भारत कोरलेले असेल,
तर विजय आपलाच असतो.”
