जिल्हाधिकारी यांनी धनज व जोंमेगाव येथील रेशीमशेती प्रकल्पांना दिली भेट
नांदेड – जिल्ह्यात रेशीमशेतीचा विस्तार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लोहा तालुक्यातील धनज बुद्रुक व जोंमेगाव येथील रेशीमशेती प्रकल्पांना काल ३१ ऑक्टोबर रोजी भेट देऊन पाहणी केली.
धनज बुद्रुक येथील शेतकरी प्रकल्पाची पाहणी
लोहा तालुक्यातील धनज बुद्रुक येथील शेतकरी संदीप दिगंबर माळेगावे यांच्या शेताला भेट देऊन त्यांनी रेशीम शेतीतील प्रगतीची माहिती घेतली. माळेगावे यांनी मागील दोन वर्षापासून रेशीमशेती सुरू केली असून, मागील दोन वर्षांत सुमारे 3 लाख रुपयांचा नफा झाल्याचे तसेच मनरेगा मार्फत 2 लाख 50 हजार रुपयांचा निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यशस्वीपणे रेशीम शेती शेतकऱ्याकडून प्रेरणा घेऊन इतर शेतकरीही या क्षेत्राकडे वळत आहेत का, तसेच रेशीमशेतीतून मिळणारे आर्थिक फायदे याबाबत सविस्तर चर्चा केली. याशिवाय त्यांनी रोप उपलब्धतेबद्दल विचारणा केली असता, शेतकरी स्वतः तुती कलमापासून रोपे तयार करतात, असेही निदर्शनास आले.
जोमेगाव येथील प्रकल्पाची पाहणी
लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील शेतकरी देविदास दिगंबर शिंदे यांच्या शेतातील सध्या सुरू असलेल्या कीटक संगोपन प्रक्रियेचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. संगोपन कालावधी, कामाची पद्धत, अळ्यांचे विविध टप्पे व अळीपासून कोश निर्मिती प्रक्रिया याबद्दल त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली.
शेतकऱ्यांसोबत संवाद
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनुदानाबाबत अडचणी आहेत का?, चॉकी (silkworm rearing) वेळेत मिळते का?याबाबत विचारणा केली. सर्व शेतकऱ्यांनी योग्य वेळेत व चांगल्या गुणवत्तेची चॉकी उपलब्ध होते तसेच रेशीम विभागाचे मार्गदर्शन समाधानकारक असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
जिल्हाधिकारी श्री. कर्डिले म्हणाले, “रेशीमशेती हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि महिला गटांसाठी स्थिर व वाढत्या उत्पन्नाचा उत्तम पर्याय आहे. रेशीम शेतीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल.”
यावेळी रेशीम विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते
