“सोने–चांदीच्या बाजारात वादळ उठणार! गुंतवणूकदारांनो, थोडा थांबा!”
वाचकांनो, सोन्या आणि चांदीमध्ये आता मोठा खेळ आजपासून सुरू होणार आहे. याकडे लक्ष द्या.सध्या सोन्याचे दर सुमारे १० टक्क्यांनी कमी झाले आहेत, तर चांदीचे दर त्यापेक्षा २९ टक्क्यांनी अधिक प्रमाणात घटले आहेत. आता चांदीचा दर अधिक का पडला, हे समजावून सांगताना आम्ही असे म्हणू इच्छितो की, ज्या वस्तूंची किंमत तुलनेने कमी असते, त्यामध्ये खरेदी-विक्रीचे प्रमाण जास्त असते.
मागील एका वर्षात सोन्याचा दर सुमारे ८० ते ९० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे सोन्यातील खरेदी-विक्रीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे. हे अगदी तसंच आहे, जसं क्रिकेट सामना पाहताना प्रेक्षक हातात पॉपकॉर्न घेऊन पाहतात कोण जिंकेल, कोण हरेल हे कुणालाही माहीत नसते. तसंच सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीकडे पाहण्याची ही वेळ आहे.
काही लोक म्हणतात की सोन्याचा दर कमी झाला म्हणजे तो अजून कमीच होईल. आम्ही तज्ज्ञ नाही, मात्र आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसारच आम्ही ही माहिती वाचकांसमोर मांडत आहोत. कारण ही घडामोड गुंतवणुकीशी संबंधित आहे. नफा झाला तर आनंद, नुकसान झाले तर खेद. त्यामुळे आम्ही केवळ तथ्य मांडत आहोत.
सध्या सोन्याचा दर १० टक्क्यांनी कमी झाला आहे. कदाचित काहींना वाटेल की यात वेगळं काय? पण हा बाजारपेठेचा “ट्रेंड” असतो, आणि तो सतत बदलत असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी ज्यांनी सोने खरेदी केले होते, त्यांनीही तेव्हा वाढलेल्या दरातच खरेदी केली. त्यामुळे आता दर कमी झाले आहेत म्हणून घाबरू नका बाजारातील बदलाकडे शांतपणे लक्ष ठेवा.
२७ ऑक्टोबरपासून ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक क्षमता आहे, ते सोन्यामध्ये आपली ‘सेटिंग’ करतील. म्हणजे काय? तर हा एक धोरणात्मक निर्णय असतो जसे, “आज सोने खरेदी करायचे. एवढ्या टक्क्यांनी दर वाढले तर विक्री करायची, आणि एवढे टक्के कमी झाले तरी विक्री करायची.” यासाठी एक संगणक प्रोग्रॅम तयार केला जातो.त्या प्रोग्रॅमला आदेश दिला जातो की, “इतका दर झाला तर खरेदी करा, इतका झाला तर विक्री करा.” एकदा ‘सेटिंग’ झाली की खरेदी आपोआप वाढते. आज सकाळी अकरा वाजल्यापासून हा खेळ सुरू झाला आहे.यानंतर जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक केली किंवा सोने विकले, तर समजा तुम्ही संगणकाशी बुद्धिबळाचा खेळ खेळत आहात आणि त्यात तुम्हालाच संगणकाला हरवावं लागेल! मोठ्या कंपन्या आणि हेज फंड्स यामध्ये सामील होतात. याला ‘अल्गो ट्रेडिंग’ म्हणतात.
हा सर्व खेळ संगणकाद्वारे चालतो. संगणक सेकंदाच्या दशांश भागात व्यवहार पूर्ण करतो. माणूस हेच काम करेल तर त्याला विचार करायला आणि निर्णय घ्यायला वेळ लागेल. संगणक मात्र आदेशानुसार थेट क्रिया करतो; तो भावनिक होत नाही. त्यामुळे ‘अल्गो ट्रेडिंग’मध्ये माणूस आणि संगणक यांची तुलना होऊ शकत नाही.आज दुपारी तीन ते सहा या वेळेत हेज फंड्स आणि मोठ्या कंपन्या हा निर्णय घेतील की, “या दरावर सोने मिळाले तर खरेदी करायचे.” आणि ते घडेलच.२८ ऑक्टोबर रोजी सोने आणि चांदी सर्वोच्च दरावर पोहोचतील. याचा परिणाम शेअर बाजारावरही होईल. बाजारात गडबड होईल आणि त्या गडबडीत प्रवेश केल्यास त्रास संभवतो. त्यामुळे पर्यायी (फ्युचर) ट्रेडिंगमध्ये मोठी उसळी येण्याची शक्यता आहे.
पर्यायी ट्रेडिंग म्हणजे काय?
या प्रकारात आधीच ठरवले जाते की, “असे काही घडले तर मी ही वस्तू घेईन, आणि तसे काही झाले तर ती परत देईन.” म्हणजे थोडे पैसे लावून मोठा व्यवहार करता येतो.२९ ऑक्टोबर रोजी याचे ‘सेटलमेंट’ होईल. हे सेटलमेंट कमोडिटी एक्सचेंजमध्ये होते, जिथे सोन्याचा व्यापार चालतो. उदाहरणार्थ, आज सोन्याचा दर १ लाख रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर एका महिन्यानंतर ठरवले जाते की १ लाख १० हजार रुपये देऊन खरेदी करायचे. त्या वेळेस बाजारभाव १ लाख १५ हजार झाला तरी, किंवा १ लाख ५ हजार झाला तरी, त्याचा परिणाम खरेदीदारावर होतो.दर वाढला तर काही गुंतवणूकदार नफा घेऊन सोने न खरेदी करता सेटलमेंट करतात. असे व्यवहार दर महिन्याला होतात. मात्र या महिन्याचे सेटलमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या महिन्यात सोन्याने सर्वात मोठा चढ-उतार अनुभवला आहे.
जर अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदारांनी सोने प्रत्यक्षात खरेदी करण्याचा निर्णय घेतला, तर मागणी वाढेल आणि पुन्हा सोन्याचे दर चढतील. सध्याच्या परिस्थितीत सोन्याचा दर २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.२९ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत एक मोठी जागतिक घोषणा होणार आहे. त्या दिवशी डॉलरचा दर काय राहतो यावर सोन्याच्या भावावर परिणाम होईल. जर डॉलरचा भाव कमी झाला, तर सोन्याचा दर वाढेल.
त्या दिवशी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यांच्या धोरणात्मक निर्णयांची घोषणा होईल. जेव्हा डॉलरचे दर कमी होतात, तेव्हा लोक डॉलर विकून सोन्यात गुंतवणूक करतात. आणि सोन्याचा दर कमी झाला तर उलट लोक सोने विकून डॉलरमध्ये पैसे गुंतवतात.३० ऑक्टोबर हा दिवस देखील अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठा चढ-उतार होईल. म्हणूनच आम्ही वाचकांना सूचित करू इच्छितो की, आजपासून ते ३० ऑक्टोबरपर्यंत सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत मोठ्या हालचाली होतील, त्यामुळे सावध रहा.
३० ऑक्टोबर रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग दक्षिण कोरियामध्ये भेटणार आहेत. जर त्यांच्या ट्रेड डीलमध्ये काही सकारात्मक मार्ग निघाला, तर सध्याची जागतिक अनिश्चितता कमी होईल. अशावेळी डॉलरमधील गुंतवणूक कमी करून लोक सोन्यात गुंतवणूक करतील, त्यामुळे सोन्याची मागणी आणि दर दोन्ही वाढतील.परंतु जर त्यांच्या भेटीत काही तोडगा निघाला नाही, तर जागतिक अनिश्चितता वाढेल आणि अनिश्चितता वाढली की सोन्या-चांदीचे दर नेहमीच वाढतात. कारण सोने ही अशी मालमत्ता आहे जी कधीही रोख स्वरूपात बदलता येते.
आज अनेक देशांच्या सरकारांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जात आहे. त्यामुळे पुढील चार दिवस म्हणजे २७ ते ३० ऑक्टोबर हे सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात.म्हणूनच आम्ही वाचकांना सांगू इच्छितो, या काळात सोन्या-चांदीच्या व्यवहारापासून दूर राहा आणि बाजारातील घडामोडी फक्त निरीक्षण करा.
