12,000 गाड्या चालवल्या म्हणे… पण त्या जात कुठे आहेत? जनता अजून फलाटावरच!
बिहारमध्ये छठ पूजेसाठी जाणाऱ्या लोकांसाठी रेल्वेने काही गाड्या अधिकच्या सोडल्या, पण त्यातसुद्धा जागा मिळत नाही. लोक स्वतःला रेल्वेमध्ये कोंबत आहेत. अशी परिस्थिती असताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मात्र आपल्या रील तयार करण्यात व्यस्त आहेत.काय घ्यायचं यातून? रेल्वेमध्ये खरंच भरपूर जागा आहे का? रेल्वेमध्ये साफसफाई आहे का? रेल्वेमध्ये सर्व काही सुरक्षित आहे का? त्या रीलवरून तर असं वाटतं की सगळं उत्तम आहे, पण प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळीच आहे. रील बनवणं आणि वास्तव यात मोठा फरक आहे, असाच हा खेळ दिसतो आहे.सध्या सोशल मीडियावर जी छायाचित्रे व्हायरल होत आहेत, ती काही मंगळ ग्रहावरून किंवा चंद्रावरून आलेली नाहीत. ती भारतातीलच रेल्वे स्थानकांची आहेत. मग हे तरी सांगा, तुम्ही भारताचे रेल्वेमंत्री आहात की मंगळ ग्रहाचे?

ज्या गुजरात राज्यात शिंक आली तरी “विकासाचे” दहा-पाच मुद्दे बाहेर पडतात, त्याच गुजरातमधील उजना जंक्शनमधून एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. रेल्वे स्थानकात प्रवेश मिळवण्यासाठी एवढी मोठी लाईन होती की ती डोळ्यांना संपेना. हे सर्व मजूर सुरतमध्ये काम करणारे असून छठ पूजेसाठी बिहारला जाण्यासाठी आले होते.या सुरतमध्ये काय रिल बनवली नाही, अश्विनी वैष्णवजी? सुरतचं उजना जंक्शन भारतात नाही का? म्हणजे तुम्ही रील बनवली म्हणजे काम संपलं का? रेल्वेच्या शौचालयाच्या कमोडवर बसून प्रवास करणारे लोक कोणत्या ग्रहाचे आहेत, असा प्रश्न Article 19 चे नवीन कुमार विचारतात.

“संघ मित्रा एक्सप्रेस”मधील काही दृश्ये समोर आली आहेत. त्यामध्ये रेल्वे डब्यात चालण्याच्या जागेवरसुद्धा लोक बसलेले आहेत. म्हणजे आता चालणं अवघड, आणि कोणाला जर शौचालयाला जायची वेळ आली तर त्याचं काय होत असेल याचा विचारसुद्धा नको करायला. अशा परिस्थितीत “संगम एकता एक्सप्रेस” प्रवाशांना घेऊन धावत आहे.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सांगतात की मुंबई, सुरत, बंगलोर या सर्व ठिकाणांहून छठ पूजेसाठी बिहारमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी उत्तम सोय करण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात काही गाड्यांमध्ये बॅग ठेवायच्या जागेवरसुद्धा लोक बसलेले दिसतात. अशा पद्धतीने लोक किती वेळ प्रवास करतात, हे विचार करणंही अवघड आहे. लहान बालकं, वृद्ध माणसं सगळेच या जीवघेण्या परिस्थितीत प्रवास करत आहेत.

कोणाला 18 तास, कोणाला 20, कोणाला 24 तास लागतात. एवढ्या घाणेरड्या परिस्थितीत प्रवास करून हे लोक जेव्हा आपल्या घरापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांची अवस्था काय झालेली असेल याचा विचार करा, अश्विनी वैष्णवजी.ज्याच्या नशिबाला हा प्रवास येतो, त्यालाच कळतं की हा त्रास किती मोठा आहे. रील बनवताना तुमच्या लक्षात हे येत नाही, हेच दुःखद आहे.
मुंबईच्या कल्याण रेल्वे स्टेशनवरील काही छायाचित्रे समोर आली आहेत. फलाटावरून जे लोक चढले, ते चढलेच, पण काही लोक रेल्वेच्या दुसऱ्या बाजूने रुळ ओलांडून गाडीत बसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या स्थितीची कल्पना सुद्धा करवत नाही. लहान लेकरं, महिला, सामान घेऊन लोक रुळांच्या मधून धावताना दिसतात.रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं की देशभरातून 12,000 रेल्वेगाड्या बिहारला चालवल्या जातील. पण त्या गाड्यांची यादी मात्र जाहीर केली नाही. त्या बारा हजार गाड्या नेमक्या कुठे आहेत, कोणत्या मार्गाने प्रवास करत आहेत, आणि कुठे जाणार आहेत, याची माहिती का प्रसिद्ध केली गेली नाही?

2023 मध्ये पंजाबहून बिहारला जाणारी एक गाडी अचानक रद्द करण्यात आली होती. 2025 मधील छायाचित्रांमध्येही त्याच अवस्थेत कोंबलेले प्रवासी दिसतात. म्हणजे दोन वर्षातच नव्हे, मागील अकरा वर्षांत काहीच बदल झालेला नाही.मोठ्या लोकांसाठी, श्रीमंत प्रवाशांसाठी “वंदे भारत” नावाची नवी रेल्वेगाडी सुरू करण्यात आली. ती महाग आहे, आणि अनेक ठिकाणी ती रद्दही केली जाते, कारण प्रवासी मिळत नाहीत. पण बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षित कक्षांची अवस्था सुद्धा सर्वसाधारण कक्षांपेक्षा वाईट आहे.
गेल्या वर्षी छठ पूजेच्या काळात सुरतमध्ये चेंगराचेंगरी होऊन दोन लोकांचा मृत्यू झाला होता. यावर्षी सुद्धा मुंबईहून बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेमधून पडून दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे. हीच आहे आपल्या “विकसित भारताची” खरी स्थिती.”शेतीत सर्व काही उत्तम आहे”, असं म्हणताना थोडी तरी लाज वाटायला हवी. भारताचा रेल्वे प्रवासी मात्र कोणत्याही त्रासात का असेना, आपला प्रवास पूर्ण करतोच. पण उगीचच गाजावाजा करू नका आणि दाखवू नका की सगळं छान चाललं आहे.आम्ही आमचं जगतो आहोत, तुम्ही तुमचं रील बनवा आणि आनंद घ्या, एवढंच आमचं म्हणणं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासाठी आहे.

