नवीन नांदेड(प्रतिनिधी)-हैदराबादहून नांदेड येथे लग्न समारंभासाठी आलेल्या एका 61 वर्षीय महिलेला चोरीचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्या बॅगमधील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण (नेकलेस) अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खुशरत बेगम अहमद इस्मत उल्ला खान (वय 61, रा. हैदराबाद) या महिला दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 12 वाजता नांदेडमधील ‘पाकीजा फंक्शन हॉल’ येथे एका लग्न समारंभासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान त्यांच्या हँडबॅगमध्ये ठेवलेले सुमारे ₹1,50,000 किमतीचे सोन्याचे नेकलेस कोणीतरी चोरून नेले.
या घटनेची नोंद नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1012/2025 अंतर्गत करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक कुसमे पुढील तपास करीत आहेत.दरम्यान, लग्न समारंभातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, फंक्शन हॉलमधील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आरोपींचा शोध सुरू आहे.
