ही लढाई फक्त पत्रकारांची नाही.. ही लढाई तुमच्या अधिकारांची आहे!

राजस्थानच्या राजकुमारी दिया कुमारी विरुद्ध पुराव्यांसह बातम्या लिहणे महागात पडले 

आमच्या सर्व वाचकांना धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या आयुष्यातील दिवाळी उजळून निघो आणि तिचा प्रकाश आपल्या जीवनात सर्वत्र पसरू दे, ही आमची मनापासून इच्छा आहे. बातम्या वाचल्यानंतर अनेकदा लोकांना अडचणींना सामोरे जावे लागते. कधी विचित्र परिस्थितीही निर्माण होते. तरीदेखील बातम्या म्हणजे बातम्याच. आमचीही अशीच इच्छा आहे की या दिवाळीच्या उजेडाने सत्ताधाऱ्यांच्या मनात काहीतरी प्रकाश पडावा.मागील अकरा वर्षांमध्ये पत्रकारितेने अत्यंत लोकमान्यता हरवत चालली आहे. हे सर्व वाचकांना माहीत आहे. तरीही काही पत्रकार आपल्यावर काय संकट कोसळेल याची पर्वा न करता निर्भयपणे पत्रकारिता करत आहेत. असेच पत्रकार अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर येतात.

भारतीय जनता पार्टीच्या राजकुमारी विरुद्ध पुराव्यानिशी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथून दोन पत्रकारांना अटक केली. हा प्रकार अत्यंत त्रासदायक आहे. याचा अर्थ असा निघतो की, पत्रकारिता करायचीच नाही का?भारतात पत्रकार कधीच संपणार नाहीत. जसे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आशिष विद्यार्थी होते, चीनच्या स्वातंत्र्य संग्रामात ‘रुडी’ नावाच्या महिला पत्रकारांनी निर्भयपणे काम केले, तसे आजही काही पत्रकार सत्य जनतेसमोर मांडण्यासाठी ठामपणे उभे आहेत.भारत सरकार आता तालिबानशी जवळीक साधत आहे, म्हणजे त्यांच्या विचारसरणीप्रमाणे चालायचे आहे का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. “पत्रावळीकर चाटू”, “पामेरियन डॉगी मीडिया”, “गोदी मीडिया” हे शब्द मागील दहा वर्षांत सर्वसामान्य झाले आहेत. तरीही हातावर मोजण्याइतके पत्रकार असे आहेत जे पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी झगडत आहेत.

त्यात एक महत्त्वाचं नाव आहे. आनंद पांडे. ते दैनिक भास्करच्या दिल्ली आणि भोपाल एडिशनचे संपादक आहेत. अनिल पांडे यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही काम केले आहे. आनंद पांडे आणि त्यांचे सहकारी हरीश दिवेकर यांना राजस्थान पोलिसांनी भोपाळ येथून अटक केली.ते दोघे ‘द सूत्र’ नावाचे पोर्टल चालवतात. या पोर्टलचे कामकाज सुरुवातीपासूनच एकाच विचारसरणीवर चालते, भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणे, व्यभिचारावर प्रहार करणे आणि समाजातील शेवटच्या घटकाच्या वेदनांना शब्द देणे. आनंद पांडे हे फक्त पत्रकार नाहीत, तर ते संविधानाचे रक्षक आणि लोकशाहीचे प्रहरी आहेत.

 

राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी या भारतीय जनता पक्षाच्या राजकुमारी आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित काही घटनांना आनंद पांडे यांनी आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध केले. जयपूरमध्ये असे अनेक पत्रकार आहेत ज्यांच्याकडे बातम्या आहेत, पण अटक होण्याची आणि परिवारावर परिणाम होण्याची भीतीमुळे त्या बातम्या छापल्या जात नाहीत. म्हणतात ना, “तलावात राहून मगरीशी वैर करता येत नाही.”ज्यांनी डोक्यावर कफन बांधले आहे असे काही पत्रकार मात्र अजूनही लढत आहेत. त्यातच आनंद पांडे आहेत. देशात भ्रष्टाचार, व्यभिचार आणि संविधानाचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनुसूचित जातीवरील अत्याचार आणि महिलांवरील अत्याचार देखील सुरूच आहेत. पण अशा बातम्यांना जागा कुठे आहे?

राजस्थानच्या कानाकोपऱ्यातून ‘द सूत्र’ कडे माहिती येत होती, कारण लोकांना ठाऊक होते, त्यांची बातमी प्रकाशित होईल. यात सरकारी जमिनी हडपण्याचा खेळ, दिया कुमारींचे कारनामे, जयगड किल्ल्यातील नियमभंग, सरकारी गोदामांवरील कब्जा, करचोरीचे प्रश्न असे अनेक मुद्दे होते. आयकर विभागाने कलम 148 नुसार दिया कुमारींना नोटीसही पाठवली होती.

 

जर त्या नोटीसीला त्यांनी सार्वजनिक उत्तर दिले असते तर ‘द सूत्र’ ने ती बाजूही प्रसिद्ध केली असती. त्यांनी न्यायालयात जाऊन बदनामीचा दावा दाखल केला असता, तर संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक झाली असती. पण तसं झालं नाही.आता या सर्व प्रकरणात पत्रकार आनंद पांडे यांच्यावर तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कारवाई झाली आहे. पुढे त्यांना कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशा टप्प्यांतून लढा द्यावा लागेल. न्यायालयात आज दोन प्रकारचे मापदंड दिसतात, “सिस्टमसोबत असलेले” आणि “सिस्टमविरोधात असलेले”.उदाहरण म्हणून अर्णव गोस्वामी प्रकरण सर्वांना ठाऊक आहे. जिथे त्यांना थेट सर्वोच्च न्यायालयातून रातोरात जामीन मिळाला. पण साधा पत्रकार असेल तर त्याला वर्षानुवर्षे तारीख पे तारीख भोगावी लागते. हा न्यायातील विषमपणा स्पष्ट दाखवतो.

 

दिया कुमारींचा पारिवारिक इतिहास, राजघराण्याची परंपरा, राजकीय पार्श्वभूमी आणि त्यांचा पक्षातील प्रवास याची माहिती सर्वांना आहे. त्याचाच एक भाग म्हणजे त्यांची आजची राजकीय ताकद. उपमुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांना वाटले की, “राजेशाही परत आली आहे.” कारण राजांना प्रश्न विचारणे राजांना कधीच आवडत नाही.

 

या सर्व घटनाक्रमामुळे पत्रकारिता दबावाखाली आली आहे, अशी पत्रकार अशोक वानखेडे यांची भूमिका आहे. पत्रकारांसाठी पुरेसा कायदा देशात आधीपासूनच आहे. परंतु पत्रकारांवर तंत्रज्ञान कायद्याचा गैरवापर करून दडपशाही केली जात आहे.आनंद पांडे यांची लढाई सुरू आहे आणि ही लढाई अनेक स्वाभिमानी पत्रकारांचीही आहे.शेवटी वाचकांना एवढंच सांगावंसं वाटतं, आमच्यासाठी काही विशेष करू नका, फक्त प्रार्थना करा. कारण आम्ही निसर्गावर, देवावर आणि सत्य पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. पत्रकारितेमध्ये काही ठिकाणी वाळवी लागली आहे, पण अजूनही काही ठिकाणी ती स्वच्छ आहे. त्या स्वच्छ पत्रकारितेसाठी ही लढाई चालूच राहील…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!