नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ २०२५’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात संभाजीराव केंद्रे महाविद्यालय, जळकोटच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले “ग्रॅज्युएट भिकारी – विडंबन अभियान” हे सादरीकरण विशेष चर्चेचा विषय ठरले.
या विडंबन नाट्यप्रयोगात आजच्या तरुण पिढीसमोर उभ्या असलेल्या बेरोजगारी, राजकारणातील हस्तक्षेप, महागाई, भ्रष्टाचार आणि शैक्षणिक धोरणातील विसंगतींवर मार्मिक भाष्य करण्यात आले. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही योग्य रोजगार न मिळाल्याने विद्यार्थ्यांची झालेली मानसिक व सामाजिक घुसमट या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आली.
या प्रयोगाचे संघप्रमुख प्रशांत कांबळे होते. त्यांनी राजकीय परिस्थिती व समाजातील बदलत्या वास्तवाचे जिवंत चित्र उभे केले. सादरकर्त्यांमध्ये पंकज नामवाड, गणेश लिंतांदळे, प्रणाली तोरलुडवार, लाडके धनश्री, गडकर आणि मुस्कान शेख यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
