नांदेड – सोमवार, दि.१३ ऑक्टोबर रोजी मंच क्र. एक क्रांतिवीर बिरसा मुंडा मंचावर लावणी हा कलाप्रकार सादर करण्यात आला. अगदी पारंपारिक लावण्यापासून ते बैठकीच्या लावण्यापर्यंत विद्यार्थ्यांनी लावल्या सादर केल्या. विशेष म्हणजे मुलींनी तर लावण्या सादर केल्याच पण काही हौशी मुलांनीही लावण्या सादर केल्या.
‘पारवळ घुमतय कसं अगबाई पारवळ घुमतय कसं’, अहो सांगा राया, सांगा मी कशी दिसते? माझ्यावरती रसिक जणांच्या नजरा, दिलबरा करिते तुला मुजरा’, ‘माडीवरती उभे राहूनही वाट पाहिली काल वाटलं होतं तुम्ही याल राया वाटलं होतं तुम्ही याल’, ‘पोटासाठी नाचते मी परवा कुनाची’, ‘कुण्या गावाचं आलं पाखरू, अहो कुण्या गावाचं आलं पाखरू. बसलय डौलात खुदु खुदु हसतय गालात’ अशा अनेक बहारदार लावण्या विद्यापीठ परीक्षेतील चारही जिल्ह्यांमधील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. उपस्थित विद्यार्थ्यांनी तर टाळ्या आणि शिट्ट्या वाजून प्रतिसाद दिला.
हा कार्यक्रम बघण्यासाठी मुद्दामून प्र-कुलगुरु डॉ.अशोक महाजन, विद्यापीठाची कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एन. मोरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालन डॉ. राजेश्वर दुडुकनाळे, ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसचे संचालक डॉ. विजय पवार, अधिसभा सदस्य यांच्यासह अनेक प्राध्यापक गुरुजन वर्ग उपस्थित होते. मंच क्र. एकवर सल्लागार मंडळ सदस्य डॉ. प्रताप देशमुख, डॉ. बालाजी भंडारे, डॉ. बालाजी सूर्यवंशी, डॉ. गजानन पाटील, डॉ. एम. आर. जाधव, डॉ. कमलाकर चव्हाण यांनी धुरा सांभाळली आहे.
याशिवाय आज मंच क्र. दोनवर विडंबन अभिनय आणि एकांकिका चालू आहेत तर मंच क्र. तीनवर शास्त्रीय तालवाद्य व शास्त्रीय सुरवात्य चालू आहे. त्याचबरोबर समूह गायन पाश्चात्य ही होणार आहे. मंच क्र. चारवर वक्तृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धा पार पडणार आहे. तर मंच क्र.पाचवर स्थळ छायाचित्रण, मेहंदी, चित्रकला, पोस्टर मेकिंग इत्यादी कला प्रकारांचे सादरीकरण होत आहे.
दि.१४.१०.२०२५ हा युवक महोत्सवाचा तिसरा दिवस. सकाळी मंच क्र. एकवर जलसा, आदिवासी नृत्य व लोकनृत्याचे सादरीकरण होणार आहे. तर मंच क्र. दोनवर शास्त्रीय नृत्य, नक्कल आणि एकांकिचे सादरीकारण होणार आहे. मंच क्र. तीनवर समूह गायन, शास्त्रीय गायन होणार आहेत तर मंच क्र. चारवर वादविवाद कथाकथनाचे सादरीकरण होणार आहे. मंच क्रमांक पाचवर मृदमूर्ती कला. रांगोळी. कलात्मक जुळवणी इत्यादी स्पर्धा पार पडणार आहेत.
