नांदेड(प्रतिनिधी)-शेतातील धुरा फोडण्याच्या कारणावरुन सख्या भावाचा विळा पोटात मारुन खून करणाऱ्या भावास भोकर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद नासीर मोहम्मद समीर यांनी जन्मठेप आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
मौजे बोळसा ता.उमरी जि.नांदेड येथील माधव गंगाराम चिकटवाड आणि धाराजी गंगाराम चिकटवाड या दोन भावांमध्ये शेतीच्या संदर्भाने वाद सुरू होता. 1 ऑगस्ट 2020 रोजी धाराजी चिकटवाडने माधव चिकटवाडसोबत शेतातील धुरा फोडण्याच्या कारणावरुन वाद झाला. माधव चिकटवाडने धाराजी चिकटवाडच्या फोटात विळा मारुन त्याला गंभीर जखमी केले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात धाराजीचा पुतण्या दिपक चिकटवाड हा सुध्दा जखमी झाला होता. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 307 प्रमाणे माधव गंगाराम चिकटवाड (26) विरुध्द धर्माबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी धर्माबादचे तत्कालीन पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांनी या प्रकरणाचा तपास करून माधव चिकटवाड विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड. सौ.अनुराधा डावखरे(रेड्डी) यांनी 10 साक्षीदार न्यायालयासमक्ष आणले. ज्यातून भक्कम पुरावा उपलब्ध झाला. खटल्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीश मोहम्मद नासीर मोहम्मद सलीम यांनी माधव गंगाराम चिकटवाडला खूनासाठी जन्मठेप आणि 10 हजार रुपये रोख दंड आणि जिवघेणा हल्लासाठी तीन वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या दोन्ही शिक्षा सोबत भोगायच्या आहेत. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार फेरोज खान पठाण आणि श्रीनिवास नाईनवाड यांनी काम केले.
भावाने केला भावाचा खून; मारेकऱ्याला जन्मठेप
