नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या शेतीची नोंद वारसा हक्काने 7/12 मध्ये घेण्यासाठी सज्जा कुष्णुर ता.नायगाव येथील तलाठ्याने 20 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 10 हजार रुपये स्विकारतांना नायगावच्या तहसील कार्यालयासमोरच रस्त्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्याला ताब्यात घेतले आहे.
6 ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने दिलेल्या अर्जानुसार त्यांची वडीलोपार्जित शेती मौजे कुष्णुर ता.नायगाव येथे गट क्रमांक 116, 146, 407 मध्ये मिळून 2 हेक्टर 21 आर आहे. त्या शेतीचे नाव वारसा हक्का प्रमाणे त्यांच्या वडीलांच्या नावावर 7/12 ची नोंद घेण्यासाठी कुष्णूर सज्जाचा तलाठी अशोक दिगंबर गिरी हा 20 हजार रुपयंाची लाच मागत आहे. आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 11.30 वाजेच्यासुमारास तहसीलदार कार्यालय नायगाव समोर 20 हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोडीनंतर 10 हजारांची लाच स्विकारण्यास संमत्ती दिली. दुपारी 2 वाजेच्यासुमारास 10 हजारांची लाच स्विकारतांना तलाठी अशोक दिगंबर गिरी (46) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याचया अंगझडतीमध्ये 1660 रुपये आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल सापडला आहे. त्याच्या घराची झडपती प्रक्रिया सुरू आहे. तलाठ्याविरुध्द नायगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचा प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सापळा अधिकारी साईप्रसाद चन्ना यांनी पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शेख रसुल, मेनका पवार, किरण कनसे, प्रकाश मामुलवार यांच्यासह ही कार्यवाही केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक राहुल तरकसे हे करणार आहेत.
10 हजारांची लाच घेणारा तलाठी गजाआड
