महान क्रांतिकारी संत शिरोमणी जगत गुरु रविदास आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी लोणाई यांची क्रूर हत्त्या राजस्थान मधील चित्तोडगड किल्ल्यावर दि. 10 ऑक्टोबर 1518 रोजी करण्यात आली. या त्याग व बलिदानाचे आपण आवर्जून स्मरण केले पाहिजे, कारण त्यांनी स्वतःसाठी नाही तर समाज हितासाठी आपले बलिदान दिले आहे.
गुरु रविदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी जवळील सिरगोवर्धनपुर येथे 15 फेब्रुवारी 1398 रोजी झाला. त्यांनी आपल्या पारंपारिक व्यवसाय असलेल्या चर्मोद्योगाकडे लक्ष न देता समाज सुधारणा, समाज प्रबोधन व समाज संघटन याकडे जास्त लक्ष दिले होते. गुरु रविदास यांच्या वडिलांकडे थोडीबहुत शेती होती तसेच त्यांचा लाकडाचा व्यवसाय होता. यातही त्यांचे लक्ष लागत नव्हते. व्यवहार आणि प्रपंच हे त्यांचे ध्येय उद्दिष्ट नव्हते.
आपल्या मुलाचे हे असे वेगळे वळण पाहून गुरु रविदास यांचे वडील रघुनंदन हे चिंतीत झाले. लग्न लावून दिल्यानंतर रविदास हे संसारात रमतील असा विचार करुन रघुनंदन यांनी बाल वयातच रविदासांचे लग्न शेजारच्याच गावातील लोणाबाई या सुंदर सुशील मुलीसोबत लावून दिले. तरीही रविदास संसारापेक्षा परमार्थाकडे जास्त लक्ष देऊ लागले. लोणाबाई यांनाही त्यांनी आपल्या सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी करुन घेतले. आता एक नाही तर दोघे मिळून आणखी अधिक जोमाने समजोन्नतीचे काम अधिक जोमाने करु लागले.
वाराणसीत येणाऱ्या साधू संतांची सेवा करणे, यात्रेकरूंना मदत करणे, त्यांच्या भोजन व निवासाची सोय करणे, त्यांच्या सोबत भजन व सत्संग करणे यातच रविदास व लोणाई हे रमले होते. अधूनमधून कधी – कधी सर्वाना घरी बोलावून भोजनदान करणे यात रविदास दाम्पत्य परम सुखाचा अनुभव करीत होते पण इकडे रघुनंदन हैराण व्हायचे ! असे रोज भोजनदान केल्याने कसे चालेल ? कुठून आणायचे हे सर्व अन्न धान्य ?
रघुनंदन यांनी रविदास आणि लोणाई यांना जवळ बोलावून प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घागरीवर पाणी टाकल्यासारखे झाले होते. मग रघुनंदन यांनी कठोर शब्दातही समजावण्याचा प्रयत्न केला पण परमार्थ हेच ज्यांचे ध्येय ठरले होते ते गुरु रविदास आणि माता लोणाई हे आपल्या उद्दिष्टापासून तसूभरही दूर जात नव्हते.
शेवटी रघुनंदन यांनी नाईलाजाने नवविवाहित रविदास आणि लोणाई यांना घराबाहेर काढले. वाराणसी शहरात गंगा नदीच्या किनाऱ्यावर एक झोपडी बांधून हे नवविवाहित दांपत्य त्या ठिकाणी सुखाने आपला संसार व मनमोकळेपणे परमार्थ करीत होते. इथे त्यांना रोखणारे कुणीही नव्हते, त्यामुळे या झोपडीला एखाद्या आश्रमाचे स्वरूप आले होते. येथे रोजच साधुसंतांचा जमाव जमू लागला. त्यानिमित्त पांथस्थ यात्रेकरू आणि मुसाफिरही मोठ्या प्रमाणात जमू लागले, मग काय या ठिकाणी रोजच भोजनावळी ऊठू लागल्या आणि दिवस-रात्र सत्संग होऊ लागले. या कार्यात गुरु रविदासांना माता लोणाई ह्या मनापासून साथ देऊ लागल्या. आलेल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे, कुणी आजारी पडले तर त्यांच्यावर औषधोपचार करणे, त्यांना धीर देणे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणे, त्यांना उपदेश करणे, रूढी परंपरा, अंधश्रद्धा यापासून दूर राहण्यास भाग पडणे यात माता लोणाई ह्या पूर्णपणे रममान झाल्या होत्या.
गुरु रविदास आणि माता लोणाई यांच्या या सामाजिक व धार्मिक कामाची चर्चा देशात सर्वत्र पसरत होती म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात देश विदेशातील शिष्यगण मिळाले होते. गुरु रविदास हे केवळ संत नाही तर संतांचे संत, संत शिरोमणी गुरु म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांना अनेक जाती धर्माचे असंख्य शिष्य मिळाले. संत मीराबाई ह्या त्यापैकीच एक होत्या. गुरु रविदासांनी त्यांना शिक्षित करून समाज प्रबोधनासाठी तयार केले होते.
शूद्र आणि स्त्रियांना शिकवणे हे मनुवादी सनातनी व्यवस्थेला मान्य नव्हते म्हणून गुरु रविदासांना त्रास देण्याचा प्रयत्न हे सनातनी लोक मोठ्या प्रमाणात करीत होते. गुरु रविदासांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करून मानवतावादी विचारांची केलेली पेरणी हे सनातण्यांच्या गळ्यात उतरत नव्हते म्हणून ते संधी मिळेल तसे रविदासांना विरोध करीत होते.
संत मीराबाई यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर सती जाण्यासाठी सनातनी लोक आग्रह करीत होते परंतु गुरु रविदासांनी या प्रथेला तीव्र प्रमाणात विरोध केला आणि मीराबाई यांना सती जाण्यापासून वाचविले. याचा राग सनातनी लोकांना होता. ते रविदासांवर आपल्या धर्माच्या विरोधात कार्य करीत आहेत असा आरोप करीत होते. याची तक्रार त्यांनी राजाकडे सुद्धा केली होती.
संत मीराबाई यांच्या आग्रहानुसार गुरु रविदास आणि माता लोणाई हे राजस्थान मधील चित्तोड येथे उपदेशासाठी गेले होते. तेथे राजवाड्यात आणि परिसरात रोज मोठ्या प्रमाणात सत्संग आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम होत होते. याची खबर परिसरातील ब्राह्मण वर्गाला देखील लागली होती म्हणून तेथे देखील ते विरोध करू लागले.
चितोडच्या किल्ल्यावर एके दिवशी दुपारी गुरु रविदास यांच्या सत्संगाचा कार्यक्रम चालला असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्राह्मण आणि सनातली लोक जमा झाले. यावेळी झालेल्या झटापटीत सनातनी लोकांनी गुरु रविदास आणि माता लोणाई यांची भर दुपारी तलवारीचे घाव घालून क्रूर अशी हत्या केली यावेळी. राज घराण्यातील असून देखील सनातनी लोकांनी मीराबाई यांचे सुद्धा काही चालू दिले नाही. अशा पद्धतीने गुरु रविदास आणि माता लोणाई यांनी आपल्या जीवाचे बलिदान समाज हितासाठी दिले आहे, तो दिवस होता दहा ऑक्टोबर पंधराशे अठरा (10/10/1518). या महान त्यागी जोडप्यास त्यांच्या बलिदान दिनानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन..!
– इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
संस्थापक, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद
मो. 855 499 53 20
