बहुजन समाजाचे त्यागी नेतृत्व मान्यवर कांशीराम जी यांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक वाचल्यानंतर प्रेरित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अधुरे कार्य पुढे चालविण्याचा निर्धार केला होता. यासाठी देशभर फिरून त्यांनी दलित शोषित समाजाचे प्रबोधन व संघटन केले.

बहुजन समाजाची बुलंद तोफ म्हणून प्रसिद्ध झालेल्या कांशीराम जी यांचा जन्म १५ मार्च १९३४ रोजी पंजाबमधील बुंगा ग्राम तालुका खवासपूर जिल्हा रोपड येथे झाला. त्यांची कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी एकदम साधी होती. त्यांनी बी.एस्सी (विज्ञान) पदवी प्राप्त केली. नोकरीची सुरुवात त्यांनी पुण्यातील केंद्र सरकारच्या डिफेन्स अकादमीत एक वैज्ञानिक म्हणून केली होती.
सामाजिक चळवळीची सुरूवात पुण्यामध्ये कार्यरत असताना त्यांनी बऱ्याच सामाजिक अन्यायांचे जवळून दर्शन घेतले आणि दिना भाना यांच्या सुट्टी प्रकरणात त्यांनी न्यायासाठी प्रशासनास प्रखर विरोध केला, ज्यामुळे त्यांनी नोकरी सोडली.
या अनुभवांनी त्यांची राजकीय आणि सामाजिक चेतना जागृत केली. संघटना व चळवळीत ते सक्रीय झाले. कांशीराम यांनी अनेक संघटनांची स्थापना केली ज्या “शिक्षण, संघटन, राजकारण !” या त्रिसूत्रीवर आधारित होत्या.
सर्व प्रथम त्यांनी BAMCEF (All India Backward and Minority Communities Employees’ Federation) १९७१ मध्ये बामसेफ या कर्मचारी संघटनेची संकल्पना मांडली. याची औपचारिक व अधिकृत स्थापना ६ डिसेंबर १९७८ रोजी दिल्लीत केली. शिक्षित ओबीसी, एससी, अल्पसंख्य समाजातील सरकारी कर्मचारी यांना एकत्रित करणे, सामाजिक जागृती करणे हे उद्देश होते. ही संघटना राजकारणापलीकडची होती; पण नंतर राजकीय चळवळीचा पाया बनली.
त्यानंतर DS-4 (Dalit Shoshit Samaj Sangharsh Samiti/ DSSSS) डी एस फोर या सामाजिक संघटनेची स्थापना ६ डिसेंबर १९८१ रोजी केली. दलित व अन्य शोषित समाजाचे संघटन करुन समाजात व्यापक जागृती केली. सामाजिक अन्यायाच्या विरोधात संघर्ष हा त्यांचा मुख्य उद्देश होता. या संघटनेचा प्रसिद्ध नारा होता : “ब्राह्मण, ठाकूर, बनिया छोड, बाकी सारे डी एस फोर.” मीडियाने मात्र “छोड” ऐवजी “चोर” हा शब्द टाकून डी एस फोरला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे हे संघटन खूप नावारूपाला आले.
यानंतर १४ एप्रिल १९८४ रोजी “बहुजन समाज पक्ष” (BSP) या राजकीय चळवळीची स्थापना कांशीराम जी यांनी केली. बहुजन समाजाला राजकीय सत्तेत आणणे हा उद्देश होता. दलित, पिछडे व अल्पसंख्याकांचा एकत्रित संघर्ष या पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये निर्माण करुन प्रस्थापित भाजप/ कांग्रेस/ समाजवादी ई. पक्षांसोबत प्रचंड झुंज दिली. वेळोवेळी त्यांना आव्हान दिले.
कांशीराम जी यांनी १५ मार्च १९८३ पासून सायकल मार्च सुरू केला. हा मोर्चा सात राज्यांमध्ये झाला आणि त्याला सुमारे ४० दिवस लागले. एकूण ४,२०० किलोमीटर अंतर त्यांनी स्वतः सायकल चालविली. देशातील कोणत्याही नेत्याने असे एवढे परिश्रम घेतले नाहित.
या सायकल मोर्च्याद्वारे त्यांनी ग्रामीण भागातील लोकांमध्ये संवाद साधला, जनजागृती केली आणि बहुजन चळवळीला जनसमर्थन मिळवले. या मोर्चामध्ये त्यांनी “Two Wheels and Two Legs” या संकल्पनेचा वापर केला, म्हणजे सायकल + स्वतःचे पाय हे चळवळीचे एक साधन म्हणून वापरले.
मान्यवर कांशीराम जी यांनी “चमचा युग” (The Chamacha Age) या नावाचे एकमेव पुस्तक लिहिले, ज्यामध्ये “चमचा” म्हणजे दलाल लोक व स्वयंकेंद्रित दलित नेतृत्वावर टीका करुन खऱ्या नेतृत्वाची गरज या विषयांची चर्चा केली आहे. त्यांनी सामाजिक दुष्प्रथांवर, वंचित समाजावर अन्याय करणार्या राजकीय व आर्थिक प्रणालींवर प्रहार केला.
मद्यपानाचा त्यांनी तीव्र विरोध केला आणि दलित व पिछड्या समाजाच्या भागात मद्यपान विरोधात चळवळी पुढे नेल्या. व्यसन करायचे तर समाज जागृतीचे करा असे ते म्हणायचे. ते स्वतः निर्व्यसनी व उच्च चारित्र्याचे त्यागी जीवन जगत होते.
त्यांचे जीवन एक प्रकारचे तथागत बुध्दासारखे त्यागाचे होते. त्यांनी जीवनभर अविवाहित राहण्याचा निर्णय केला, वैयक्तीक मालमत्ता न मिळवण्याचा संकल्प केला. त्यांनी कुठे बँकेत पैसा जमा केला नाही की कुठे जमीन खरेदी केली नाही. स्वतःचे म्हणून असे कांहीही बाळगले नाही.
त्यांचा राष्ट्रवाद व धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन होती; त्यांनी दलित-बहुजन चळवळीला सर्वसमावेशक दृष्टिमुळे चालवले. त्यांची संसदिय व राजकीय कारकिर्द चांगली गाजली. कांशीराम यांनी लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य म्हणून देखील काम केले.
१९९९ च्या संसदीय निवडणुकांमध्ये बसपाने १४ जागा जिंकल्या. २००१ मध्ये त्यांनी नेतृत्व मायावती यांना हस्तांतरित केले. त्यामुळे बहन मायावती ह्या चार वेळा उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री बनू शकल्या.
ते आजन्म राजकारणामध्ये सक्रिय होते अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत. ९ ऑक्टोबर २००६ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी नमन..!
– इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, पत्रकार, नांदेड
मो. 855 499 53 20
