विमानतळ पोलीस ठाण्यात रात्री 10 नंतर होते हजेरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात रात्री 10 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत हजेरी घेण्याचा प्रकार सुरू झाला असून त्यामुळे पोलीस अंमलदार कंटाळले आहेत. एका पोलीस अंमलदाराने तर मला हे हजेरी मेजरचे कामच नको कारण माझ्यावर मानसिक दडपण येत आहे असा संदेश विमानतळ पोलीस ठाण्याच्या व्हाटसऍप गु्रपवर लिहिला आहे.
नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले चितंबर कामठेवाड यांनी मोदक प्रसाद माध्यमाने मी येथे आलो आहे असे ते स्वत: सांगतात आणि अनेकांना सांगतात. असो ते त्यांचा विषय आहे. मोदक देणारे ते मोदक घेणारा देव त्यांचा मग आम्ही उगेच लेखणी का झिजवावी. पण त्या पोलीस ठाण्यात असणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या संदर्भाने मात्र आमच्या लेखणीला झिजवणे ही आमची जबाबदारी आहे. नाही तर आमची पत्रकारीता येलो जर्नलीझम ठरेल.
एक फोटो प्राप्त झाला. तो फोटो 6 ऑक्टोबर 2025 चा आहे. त्यावर वेळ रात्रीची 10.11 वाजताची आहे. या संदर्भाने जरा जास्त माहिती घेतली असता ती रात्रीची हजेरी आहे आणि ती पोलीस निरिक्षक कामठेवाड हे स्वत: घेतात असे सांगण्यात आले. यापुर्वीही असेच एक महान पोलीस निरिक्षक नदी पलिकडे होते. ते तर रात्री 12 वाजता हजेरी घ्यायचे. यामध्ये प्रश्न आम्हाला असा मांडायचा आहे की, वेगवेगळ्या पोलीस निरिक्षकांच्या वागण्याच्या वेगवेगळ्या पध्दती असतात. सर्वसामान्यपणे कोठे-कोठे तिन शिफ्टमध्ये पोलीस काम करतात. सकाळी 8 ते दुपारी 2, दुपारी 2 ते रात्री 8 आणि रात्री 8 ते पहाटे 8. काही काही ठिकाणी 12 तासांची पण शिफ्ट आहे. ती सकाळी 8 ते रात्री 8 आणि रात्री 8 ते सकाळी 8 अशी काम करते.
प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहिती नुसार पोलीस निरिक्षक चितांबर कामठेवाड यांनी दोन शिफ्टमध्ये ड्युटी सकाळी 10 ते रात्री 10 आणि रात्री 10 ते सकाळी 10 अशी केली आहे असे सांगतात. सोबतच हजेरी सुध्दा रात्री 10 च्या नंतर होईल. हजेरीत बऱ्याच बाबी असतात. ज्या अधिकाऱ्यांनी पोलीस अंमलदारांना सांगायच्या असतात. त्यामुळे वेळ जातो. मग कोणत्या पध्दतीने पोलीस काम करतील की, रात्री 10 नंतर हजेरी देतील ती हजेरी कधी-कधी रात्री 11 च्या नंतर संपते. मग ते कधी घरी जातील, कधी जेवन करतील, कधी आपल्या कुटूंबाला वेळ देतील आणि पुन्हा सकाळच्या ड्युटीवर कधी येतील. या प्रश्नांची उत्तरे कोण शोधणार? आता देवच पोलीस निरिक्षक चितांबर कामठेवाड यांचे आहेत तर मग कोण त्यांना प्रश्न विचारणार आणि कोण या घटनाक्रमाची चौकशी करणार.
या घटनाक्रमात विमानतळ पोलीस ठाण्याच्या व्हाटसऍपगु्रपमध्ये हजेरी मेजरचा संदेश सुध्दा वाचण्यात आला. त्यानुसार त्यांनी पोलीस निरिक्षकांना लिहिले आहे की, मला हजेरी मेजर हे काम करायचे नाही. कारण त्यामुळे माझ्या मनावर दडपण येत आहे आणि माझे काही बरे वाईट होवू शकते. आता त्या बिचाऱ्या हजेरी मेजरची कथा आणि व्यथा ऐकतील तर फक्त शहाजी उमाप.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!