जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

नांदेड (प्रतिनिधी)– महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक केमाअ-2008/प्र.क्र.378/08/सहा, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 20.09.2008 अन्वये माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याची व्यापक प्रचार प्रसिद्धी व प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस राज्यस्तरावर “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.

आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत माहिती अधिकार कायदा अभ्यासक व अधिवक्ता डॉ. भीमराव हाटकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या प्रतिपादनात अधोरेखित केले की, माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त अर्जांची कार्यवाही अधिकारी व कर्मचारी यांनी संवेदनशीलता, पारदर्शकता व तत्परतेने करणे अत्यावश्यक आहे.

माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी 28 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने शासन निर्देशानुसार सोमवार, दि. 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.

डॉ. हाटकर यांनी माहिती अधिकार कायद्याची निर्मिती, वेळोवेळी झालेले दुरुस्त्या, तसेच त्यानुषंगाने समाजमन व प्रशासकीय घटकांच्या मानसिकतेतील बदल याविषयी सविस्तर माहिती दिली. माहितीचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून, त्याचा सन्मान राखत अधिकारी-कर्मचारी यांनी कर्तव्यभावनेने अर्ज हाताळावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यशाळेनंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, तहसीलदार शंकर लाड, तहसीलदार विकास बिरादार, नायब तहसीलदार जया अन्नमवार, विधी अधिकारी आनंद माळाकोळीकर यांच्यासह विविध संवर्गातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!