वजीराबादच्या मातीत उगवलेला एक असा पोलीस गणपत बाबुराव शेळके ज्यांच्या मनात माणुसकीचा ओलावा आहे, आणि हृदयात कर्तव्याची मशाल पेटलेली आहे. वर्दी अंगावर घेतली असली तरी त्यांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचं नव्हे, तर संवेदनशीलतेचंही उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं, नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भाग जलमय झाले, आणि शेतकऱ्यांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं. अशा काळोख्या संकटात शेळके यांच्या मनातील उजेड त्यांनी कृतीतून दाखवला – “खारीचा वाटा” म्हणत त्यांनी आपल्या पगारातील अर्धा हिस्सा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दान देण्याची विनंती पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
“कर्तव्य ही माझी पूजा, आणि माणुसकी माझा धर्म” हे शब्द शेळके यांनी उच्चारले नसले, तरी त्यांच्या कृतीतून हे स्पष्ट दिसून येते. पोलिसांनी केवळ कायदा पाळवावा, अशी समाजाची अपेक्षा असते, पण इथे तर गणपत शेळके यांनी हृदयाची दारे उघडून सहवेदनेचे पाझर झिरपवले आहेत.
त्यांनी आपल्या अर्जात आपल्या बँक खात्याचे तपशील दिले असून, सप्टेंबर महिन्यातील पगारीतील पंधरा दिवसांचे वेतन पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे पाठवले जाणार आहे. या अर्जाला वजीराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनीही संमती दर्शवून पुढील कार्यवाहीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवले आहे.
आजच्या काळात, जिथे स्वतःच्या सुखासाठी स्पर्धा सुरू आहे, तिथे “दुसऱ्याच्या दु:खातही आपली जबाबदारी शोधणारा एक वर्दीतला देवदूत” आपल्याला मिळतो, हे भाग्यच म्हणावं लागेल.वास्तव न्यूज लाईव्ह गणपत शेळके यांच्या या पवित्र पावलाचे मन:पूर्वक कौतुक करत आहे. कारण, जर अशा कृतींना लेखणीने ओळख दिली नाही, तर लेखणीही आपल्या कार्याशी बेईमानी करेल.कारण, “थेंब थेंब तळे साचे, थोडक्यात मोठं घडतं” आणि हीच थोडकी मदत, कोणाच्यातरी आयुष्याचं मोठा उजेड सकाळ ठरू शकते.
