नांदेड(प्रतिनिधी)–शहरात मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून गोदावरी काठावरील खडकपूरा व दुल्हेशाहनगरमध्ये पावसाचे पाणी जाऊन एकाचा मृत्यू झाला होता तर वीज पडून एका कुटूंबाचे आर्थिक नुकसान झाले होते. माजी महापौर प्रतिनिधी विलास धबाले व युवानेते बंटीभाऊ लांडगे यांनी या दोन्ही कुटूंबांना 75 हजार रूपयांची आर्थिक मदत करत प्रभाग क्र. 18 मधील पुरग्रस्तांना मदतीचा हात देत अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्वरूपात मदत दिली जात असली तरी अनेक ठिकाणी मदत पोहचत नाही. त्या तुटपूंज्या मदतीवर नागरीक नाराजी व्यक्त करत आहे. यात शहरालगत असलेल्या खडकपूरा, दुल्हेशाह नगर, पंचशील नगर, देगाव चाळ या भागात अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी महापौर प्रतिनिधी विलास धबाले व युवानेते बंटीभाऊ लांडगे यांनी नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत खडकपूरा येथे पाण्यात बुडून मृत्यू पडलेल्या युवकाच्या कुटूंबास 50 हजार व दि. 26 पहाटेच्या सुमारास दुल्हेशाह रहेमान भागात वीज पडून एका कुटूंबाचे घर उद्धवस्त झाले होते, या कुटूंबास 25 हजार रूपये अशी एकूण दोन्ही कुटूंबास 75 हजार रूपयांची आर्थिक मदत केली व पावसामुळे बेघर झालेल्या नागरिकांना खिचडी वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक आपत्तीच्या धैर्याने सामोरे जावे, आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत, असे विश्वास विलास धबाले आणि युवानेते बंटीभाऊ लांडगे यांनी नागरिकांनी दिला आहे.
