नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड शहर आणि जिल्ह्यात पावसाचे संकट गडद झाले असून, गोदावरी नदीची पातळी 353.90 मीटर पर्यंत पोहोचली आहे. ही पातळी धोक्याच्या इशाऱ्याच्या वर गेली असून, नागरिकांनी तातडीने सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नांदेडकरांसह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांवर सतत धोका निर्माण झाला आहे.
विष्णुपुरी प्रकल्पातून वाढता विसर्ग
शुक्रवारी सकाळी विष्णुपुरी धरणातून दीड लाख क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र दुपारपर्यंत हा विसर्ग वाढत 2,19,299 क्युसेक्स पर्यंत पोहोचला. यामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी वेगाने वाढून धोक्याच्या पातळीला गाठली.
सखल भागात पाणी साचले, संपर्क तुटले
नांदेड शहरातील तसेच जिल्ह्यातील सखल भागांमध्ये पाणी साचले असून, काही गावांचा मुख्य प्रवाहाशी संपर्क तुटलेला आहे. नद्या, नाले, ओढे हे तुडुंब भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
प्रशासनाचा इशारा आणि मदतीचे क्रमांक
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आपत्कालीन सेवा क्रमांक जाहीर केले आहेत:
02462-235077 (आपत्कालीन कार्य केंद्र)
टोल फ्री क्रमांक: 1077
सखल भागातील नागरिकांनी आपली घरे रिकामी ठेवावीत, जनावरे व हलवता येणारे साहित्य उंच ठिकाणी हलवावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वित्तहानी बरोबर जीवितहानी टाळण्यासाठी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
वास्तव न्यूज लाईव्हचा जनतेला इशारा
वास्तव न्यूज लाईव्हकडूनही जनतेला आवाहन करण्यात येत आहे की, गोदावरी नदीपासून दूर राहावे, हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
महत्त्वाची सूचना:
कोणतीही आपत्कालीन गरज भासल्यास वरील क्रमांकांवर त्वरित संपर्क साधा. सध्याच्या परिस्थितीत सतर्कता आणि सजगता हाच सर्वोत्तम बचाव आहे.
