नांदेड (प्रतिनिधी)- डेकोरेशनचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला दररोज 10 हजार रुपयांचा हप्ता देण्याची जबरदस्ती करत, मारहाण करून जिवे मारण्याची धमकी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांविरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव शिवराम गुरव (डेकोरेशन व्यावसायिक, रा. नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास, हिंगोली गेट येथील व्यंकटेश नगर भागात गणपत माठवाले, ऋषी भाटिया, कुणालसिंघ आणि मनप्रीतसिंघ उर्फ सोनू अवलख यांनी त्यांना अडवून दररोज 10 हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली.
तसेच, त्यांनी वैभव गुरव यांच्या डोक्यात आणि हातावर मारहाण केली व जिवे मारण्याचा प्रयत्नही केल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 404/2025 नोंदविण्यात आला आहे.सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
