गोदावरीचा रौद्रावतार! नांदेड पाण्याच्या तडाख्यात!

विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले; नांदेडमध्ये पूरस्थिती, सखल भाग जलमय

नांदेड (प्रतिनिधी)- विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल 16 दरवाजे उघडण्यात आले असून, त्यामुळे नांदेड शहरात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सखल भागांत पाणी साचले असून, अनेक वस्त्यांमध्ये घरातच पाणी शिरल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात व नांदेडमध्येही अविरत पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. नाल्यांचे पाणी गोदावरीत मिसळू शकत नसल्यामुळे सखल भागांमध्ये जलसंचय निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, दरवाजे आणखी उघडले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्वतःच्या आणि शेजाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे बहुतेक सर्वच प्रकल्प 100% क्षमतेने भरलेले असून, पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे.विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच, नाव घाट, रामघाट, मरघट, गोवर्धन घाट परिसरातील पाणी पातळी 354 मीटरच्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शहरात पूरस्थिती अधिकच गंभीर होत आहे.

 

नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक

घरातील साहित्य, महत्वाची कागदपत्रे सुरक्षित स्थळी ठेवावीत, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. शहरात अनेक भाग जलमय झाल्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.याशिवाय, पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गोदावरीकाठच्या भागात गर्दी करत आहेत, जे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रकल्पातील दरवाजे अजून उघडल्यास अचानक पाण्याचा विसर्ग वाढू शकतो आणि यामुळे जिवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.

 

पोलिस प्रशासन सज्ज; ध्वनीक्षेपकांद्वारे सूचना

शहरातील विविध घाट परिसरात पोलीस विभाग सतर्क असून, लोकांना पाण्याच्या जवळ न जाण्याच्या सूचना ध्वनीक्षेपकांद्वारे दिल्या जात आहेत. “वास्तव न्यूज लाईव्ह”कडून देखील नागरिकांना पूर पाहण्यासाठी पाण्याजवळ जाणे टाळा, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

२० वर्षांनंतर अशी पूरस्थिती

नांदेड जिल्ह्यात सुमारे २० वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पूरस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक नागरिक फक्त पूर पाहण्यासाठी घराबाहेर पडत असून, हे जीवघेणे आकर्षण ठरू शकते.

 

नागरिकांना आवाहन

कृपया सुरक्षित अंतर ठेवा, अनावश्यकपणे नदीकाठी जाऊ नका. प्रशासनाच्या सूचना पाळा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका.असे आवाहन नांदेड ब्यूज लाईव्ह सुद्धा करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!