नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या दुल्हेशाह रहेमाननगरमध्ये पुराचे पाणी आल्याने घरातून सामन बाहेर काढण्याच्या घाईमध्ये पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एका 16 वर्षीय बालकाचा जीव गेला आहे.
शहरातील दुल्हेशाह रहेमाननगर येथे आज बुधवारी सकाळी विष्णुपूरी धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने त्या वस्तीत पाणी शिरले. वस्तीमध्ये 3 ते 4 फुटापर्यत पाणी साचलेले दिसत होते. आपल्या घरातील सामान सुरक्षीत स्थळी नेण्याची घाई सर्वांनाच होती. याच वस्तीत एका घरात राहणारा बालक मिनाज खान (16) हा सुध्दा घराबाहेर सामान काढण्याच्या प्रयत्नात असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खाली बुडाला. काही वेळानंतर लोकांच्या लक्षात आले की, मिनाज खान हा गायब झाला. त्यांच्याच वस्तीतील लोकांनी शोधा-शोध करून मिनाज खानचा मृतदेह बाहेर काढला.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वस्तीतील नागरीकांनी महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या निष्काळजीपणामुळेच असे घडल्याचे सांगितले. फक्त पाणी सोडले जात आहे असे व्हाटसऍपवर संदेश देवून लोकांच्या जीवांचे रक्षण होत नसते. अगोदरपासूनच प्रशासनाने पाणी वाढणाऱ्या भागांबद्दल माहिती घेवून तेथील लोकांना सुरक्षीत स्थळी हालविण्याची जबाबदारी पार पाडली नाही असा आरोप होत आहे.
संबंधीत व्हिडीओ…
पुराच्या पाण्यात बुडून 16 वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू
