नांदेड(प्रतिनिधी)-आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ दगडफोडो आंदोलन करून वडार समाजाची गणती अनुसूचित जमाती प्रवर्ग उपवर्गात करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
आज सकल आदीवासी वडार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजेपासूनच पारंपारीक व्यवसाय असलेला दगडफोडण्याचा कारभार आंदोलनात आणला आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दगडफोडो आंदोलन केले. त्यांच्या निवेदनात असे म्हटले आहे की, दगडफोडून व माती काम करून देशाच्या आणि राज्याच्या विकासात महत्वाचे असणाऱ्या दळणवळणासाठीचे रस्ते, टोले जंग प्रशासकीय इमारती, सिंचनाची मोठ-मोठी धरणे, ऐतिहासीक गडकिल्ले आणि मंदिरे बांधण्यात वडार समाज नेहमीच पुढे होता. शासन आणि लोकप्रतिनिधींनी वडार समाजाला न्यायापासून वंचित ठेवले आहे. आजच्या परिस्थितीत मराठा, धनगर, वंजारी, बंजारी या सर्वांना आरक्षणाची पुर्तता होत असतांना आरक्षण नसल्याने इतरांची घरे बांधून देणारा वडार समाज मात्र हालाकीचे जीवन जगत आहे. त्यांच्या मागण्यांप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्ग, उपवर्ग करून एस.टी.(बी) प्रवर्गात वडार समाजाचा समावेश करावा, शासकीय कामातील कामे वडार समाजासाठी आरक्षीत ठेवावे. जिल्हा निहाय वडार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह तयार करुन द्यावे अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
सकल वडार समाजाचे दगडफोडो आंदोलन
