नांदेड (प्रतिनिधी) — शिवाजीनगर पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणाचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक लाख तेहतीस हजार पाचशे रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि चाळीस हजार रुपये किमतीची स्कूटी जप्त करण्यात आली आहे. या तिघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्हे शोध पथकाचे प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद साजिद हुसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी गस्त दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, मगनपुरा भागातून महेश कृष्णाजी तुतारे पाटील (वय 30) आणि सोनू सिंग मुक्तयार सिंग चाहाल (वय 28) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.तपासादरम्यान महेश तुतारेच्या ताब्यातून ₹500 किमतीच्या 73 बनावट नोटा (एकूण रक्कम ₹36,500) आणि सोनू चाहालच्या ताब्यातून ₹500 किमतीच्या 194 बनावट नोटा (एकूण ₹97,000) जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर, ₹40,000 किमतीची एक स्कूटी (नंबर: MH 26 BB 0674) देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
या बनावट नोटांचा स्त्रोत शोधताना, आरोपींनी या नोटा छत्रपती संभाजीनगर येथील मसू पांडुरंग शेळके (50) यांच्याकडून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई करून मसू शेळकेला देखील अटक केली आहे.
या संपूर्ण कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद साजिद हुसेन, तसेच पथकातील पोलीस अंमलदार अनिल झांबरे, उमेश अकोसकर, लिंबाजी राठोड, अंकुश लंगोटे, संजय यमलवाड आणि दीपक ओढणे यांनी सहभाग घेतला.
