1 नोव्हेंबरपासून नियमित शालेय कामकाज सुरू होणार; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही
नांदेड (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने 2025 सालच्या दिवाळी सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना 17 ऑक्टोबर (शुक्रवार) ते 31 ऑक्टोबर (शुक्रवार) 2025 या कालावधीत दिवाळी सुट्टी राहणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीत एकसंधता राहावी, यासाठी शिक्षण विभागाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुट्टीचे नियोजन केले आहे. सुट्टीचा कालावधी सर्वच प्रकारच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना लागू असेल.यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर वगळून इतर सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी सुट्टी लागू होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.दिवाळीनंतर 1 नोव्हेंबर 2025 (शनिवार) पासून पुन्हा सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षण सुरू होणार आहे.ही दिवाळी सुट्टी राज्य मंडळाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना लागू राहणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांना ही सूचना अनिवार्य आहे.या आदेशावर जिल्हा परिषद नांदेडचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी असून, सर्व संबंधितांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
