नांदेड (प्रतिनिधी)-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील महिला कार्यकर्ता निकिता व्यंकट शहापूरवाड आणि त्यांच्या पतीविरुद्ध अवघ्या २४ तासांत दुसरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात ३ लाख रुपयांची फसवणूक झाली होती, तर नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यात २ व्यक्तींच्या मिळून एकूण १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मोहम्मद नसीर अहमद मोहम्मद बशीर अहमद (रा. हमीदिया कॉलनी, खुर्दबई नगर, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०६ ते ११.१३ या अवघ्या सात मिनिटांच्या कालावधीत गोविंद कॉलनी, सिडको, नांदेड येथे निकिता शहापूरवाड त्यांच्या पती व्यंकट गोविंदराव शहापूरवाड यांनी संगनमत करून एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड स्वॅप मशीनवर वापरून ७ लाख रुपये काढले.तसेच दुसऱ्या घटनेत, निखिल नंदकुमार गादेवार यांचे १४ जुलै २०२५ रोजी आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून ३ लाख ५० हजार रुपये काढून घेतले गेले.पैसे परत मागितल्यावर आरोपींनी पैसे न परतता शिवीगाळ, तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा क्रमांक ९०९/२०२५ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.
