कुंटूर (प्रतिनिधी)- कुंटूर पोलिसांनी एक अत्यंत प्रशंसनीय कामगिरी बजावत, 16 वर्षे 11 महिने वयाची एक अल्पवयीन मुलगी फक्त काही दिवसांत शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केली आहे.
ही मुलगी 15 सप्टेंबर रोजी कॉलेजला जाण्यासाठी सकाळी घरातून निघाली होती, परंतु ती परत घरी आली नाही. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीने फुस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. संबंधित प्रकरण गुन्हा क्र. 219/2025 अंतर्गत नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक साधनांचा वापर करून महत्त्वपूर्ण माहिती मिळवली. पोलीस उपनिरीक्षक नागोराव फुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदयाल सिंह ठाकूर आणि पोलीस अंमलदार सय्यद सलमा, दीपक ओढणे यांनी अथक मेहनत घेत ही मुलगी तेलंगणा राज्यातील मेडचल येथे असल्याचा सुगावा लावला.
त्यानंतर त्वरित एक पोलीस पथक मेडचलला रवाना करण्यात आले. तेथून सदर अल्पवयीन मुलीला सुरक्षितरित्या शोधून गुंटूरला आणण्यात आले आणि तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
या यशस्वी कार्यवाहीबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. श्याम पानेगावकर,कुंटूरचे सहायक निरीक्षक विशाल भोसले यांनी संबंधित पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे. त्यांच्या जलद, कुशल आणि जबाबदारीने केलेल्या कामगिरीमुळे एक कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे.
