बंद करा हे टोलनाके आणि टोलगुंडागर्दी..!

 

टोलनाक्यावर होणारी गुंडागर्दी ही नवीन नाही. त्यात घट नाही तर वाढ होत चालली आहे. आता पत्रकारांनाही या टोलगुंडागर्दीचा सामना करावा लागत आहे. याचा राज्यकर्त्यांनी अत्यंत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, नसता लोकशाहीचा हा चौथा स्तंभ धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

थोडीशी गुंतवणूक करुन जनतेला अनेक वर्ष हजारो पटीत लुटण्याचा सरकारी परवाना ज्यांना मिळतो ते मस्तीला येणारच. टोलवसुलीसाठी ते आपल्या पदरी गुंडांना बाळगणारच. शेवटी पैसा बोलता है. पैसे वसुली करीत असतांना अरेरावी करणे, उद्धट बोलणे, दादागिरी करणे, अंगावर धावून येणे, मारहाण करणे असे प्रकार रोज कुठे ना कुठे टोलनाक्यावर घडत असतात. त्यात सामान्य जणांबरोबर कर्मचारी, अधिकारी, पुढारी, व्यापारी, शेतकरी आणि पत्रकारही भरडल्या जात असतील तर सरकार हे टोलनाके का बंद करीत नाहीत ? टोलधाडीच्या या वाढत जाणाऱ्या गुंडगिरीसमोर सरकार गुडघे का टेकत आहे ?

परवा नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील टोलनाक्यावर कांही पत्रकारांना गंभीर स्वरुपाची मारहाण झाली. याचा निषेध करावा तितके थोडे आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर उघडपणे झालेला हा गंभीर स्वरुपाचा हल्ला आहे. याची सरकारने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

टोलनाक्यावरील या गुंडागर्दीत पत्रकार किरण ताजणे यांना मारहाण झाली. त्यात त्यांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या असून त्यांच्या सोबत असलेल्या दोन सहकाऱ्यांनाही बेदम मारहाण झाली आहे. धरा, पकडा, ठोका, हाणा, मारा, जिवंत सोडू नका अशा गर्जना करीत टोलनाक्यावरील गुंड अरदांड कर्मचाऱ्यांनी आपली भ्याड मर्दुमकी दाखविली.

केंद्र व राज्य सरकार असमर्थ आहे काय ? विकास कामे करण्याची सरकारमध्ये ताकत नाही काय ? नसेल ताकत तर गप्प बसा. सरकार जवळ पैसा नसेल तर नुसत्या विकासाच्या गप्पा मारु नका. अशा गुंड टोलधाडीचा विकास आम्हाला नको आहे. हा विकास नाही जनतेला लुटण्याचा आधुनिक प्रकार आहे. तो बंद झाला पाहिजे.

रस्ते आणि पुल बांधण्यासाठी खाजगी लोकांना काम द्यायचे आणि त्याला अनेक वर्ष जनतेला लुटायचा परवाना देऊन टाकायचा. ही कुठली विकास नीती आहे..? त्याने जर त्या कामावर शंभर कोटी रुपये खर्च केले तर त्याला हजार कोटी रुपये वसूल करण्याचा परवाना द्यायचा. याला सरकार विकास म्हणत असेल तर हा विकास नसून जनतेला लुटण्याचा सरकारी कार्यक्रम आहे. सरकारचा हा गोरखधंदा तात्काळ बंद झाला पाहिजे.

सरकार एकीकडे लाडक्या बहिणींना दरमहा करोडो रुपये फुकट वाटत आहे आणि तिजोरीत पैसा नाही म्हणून गुत्तेदारांना कामे देऊन टालनाके उभारुन जनतेला लुटण्याचे परवाने देत आहे. ही सरेआम सरकारची बदमाशी दिसून येत आहे. “आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा !” असेच जर सरकारचे धनदांडग्या गुत्तेदारांना आणखी धनदांडगे बनविण्याचे व सर्वसामान्य जनतेला नागवण्याचे धोरण असेल तर जनतेने सरकारच्या या टोलनीतीच्या विरोधात एल्गार पुकारला पाहिजे ! टोलनाक्यांच्या विरोधात व्यापक जन आंदोलन उभारले पाहिजे.

आंदोलन करणाऱ्या जनतेच्या कमरेत उडून लाथ मारणाऱ्या जालनाचे पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णीच्या विरोधात गृह विभाग व सरकारने कोणती कारवाई केली ? मुंबईतील विधान भवनाच्या कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यास आ. संजय गायकवाड यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात सरकारने काय कारवाई केली ? ख्रिश्चन धर्म गुरुंचा सैराट करा असे म्हणणाऱ्या आ. गोपीचंद पडळकर यांना सरकारने आवर घातला काय ? सरकारने हे वेळीच केले नसल्याने आज तोच आमदार जयंत पाटलांच्या बापावर संशय घेतो ! ही एवढी मजल मारण्याची हिंमत यांना कोण देतो ?

शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या या महाराष्ट्र राज्यात कायदा चालतोय की गुंडांचा गुंडाराज ? टोल वसुलीच्या नावाखाली लोकांची लूट करणाऱ्या या टोलधाडींना एवढे बळ कुठून येते ? कोणत्या शक्ती यांच्या पाठीशी असतात ? कोणता राजकीय पक्ष यांना आधार देतो ? कोणती पोलिस यंत्रणा यांना अभय देते ? ज्यामुळे हे पत्रकारांनाही सोडत नाहीत. पत्रकारही यांना कस्पटासमान वाटणार ! सामान्य नागरिक तर रोजच रक्तबंबाळ होतात पण आता पत्रकारही यांच्या निशाण्यावर आले आहेत. राज्यात हे जे होत आहे ते योग्य नाही होत देवाभाऊ ! बघा, वेळीच सावरा !! तुमची मिस्टर क्लीनची प्रतिमा खराब होऊ देऊ नका. उद्याचे भारताचे प्रधान मंत्री म्हणून लोक तुमच्याकडे आशेने पाहत आहेत. एकदा महाराष्ट्रातले पत्रकार बिघडले तर मग तुम्हाला नागपूरची रेशीमबाग ही सावरु शकणार नाही. पत्रकारांना योग्य ते संरक्षण द्या. राज्यातील गुंडपुंड टोलधाडींना वेळीच आवर घाला. नव्हे ही टोलधाड बंदच करुन टाका. काय द्यायचे ते एकदाच देऊन टाका या टोलचालकांना. यासाठी जनतेला रोज त्रास देऊ नका.

कुठे आहे पत्रकार संरक्षण कायदा ? तो फक्त कागदोपत्रीच आहे काय ? त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी करणार ? राज्यातील पत्रकारांना संपूर्ण संरक्षण कधी मिळणार ? पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांवर अशी कडक कारवाई झाली पाहिजे की पुन्हा कुणी पत्रकारांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही.

कुणीही उठसूठ पत्रकारांना धमकावण्यात धन्यता मानत असेल, बेधडकपणे पत्रकारांवर हल्ला करीत असेल तर राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे हे लक्षण आहे. याची वेळीच दक्षता घ्या देवाभाऊ ! डोक्यावरुन ओघळ जात आहे. सर्व अंग भिजण्याची वाट पाहू नका.

देवाभाऊ, आज तुमचे जबाबदार बिनानावाचे बॅनर राज्यात सगळीकडे झळकत आहेत. सरकारी खर्चाने नुसते शिवाजी महाराजांना अभिवादन केल्याने शिवशाही साकारत नाही तर गुंडगिरीला आवर घाला. नुसती टोलवाटोलवी नको. टोलनाक्यावरील टोलधाडीला आवर घाला. बंद करुन टाका ही टोलनीती ! राज्यातील जनतेची ही टोलदुखी कायमची बंद करुन टाका. वाटल्यास यासाठी लाडक्या बहिणींची राज्याला बरबाद करणारी लोकप्रिय योजना कायमची बंद करुन टाका. किती दिवस दात कोरुन पोट भरणार ? सामाजिक न्याय विभागाचा व विविध महामंडळांचा पैसा लाडक्या बहिणींकडे वळविला जात आहे. हे योग्य नाही. हा रोष सरकारला महाग पडू शकतो. त्यात पुन्हा पत्रकारांचा रोष म्हणजे हे राज्य टिकेल काय ? पुरोगामी म्हणून महाराष्ट्राची एक वेगळीच प्रतिमा आहे, या प्रतिमेला मलिन होऊ देऊ नका देवाभाऊ..!

 

– इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

संस्थापक, अ. भा. पत्रकार समता परिषद

मो. 855 499 53 20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!