नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून काळजी घेण्याचे जिल्हाप्रशासनाचे आवाहान

 

 

नांदेड – दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 06 वाजता भोकर तालुक्यातील पांडुरणा या गावाच्या पूर्वेला व पश्चिमेला भूगर्भातून आवाज आल्याची ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता या आवाजाची/ धक्क्याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे आढळून आले. तरीही अजून सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना देखील माहिती घेण्यास सांगितले होते पण अर्थ सायन्स विभागात सुद्धा कुठलीही नोंद झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

पुन्हा आज दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 व 10:15 वाजता भोकर शहरात 1. शाहू शाळा शेखपरीत नगर, 2. हनुमान नगर 3. किनवट रोड परिसर या ठिकाणी जमिनीतून आवाज येऊन दोन वेळा जमीन हादरल्याची माहिती शहरवासियांनी प्रशासनाला दिली. त्यानुसार पुन्हा एकदा राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता या धक्क्याची कुठलीही नोंद संकेतस्थळावर झाली नसल्याचे दिसून आले परंतु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागात सदर दोन धक्क्यांपैकी दहा वाजता बसलेल्या धक्क्याची नोंद झाली असून या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 1.1 एवढी नोंदविण्यात आली असून याचा केंद्रबिंदू बोरवाडी गावाच्या आसपास असल्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉक्टर टी. विजयकुमार यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे. सदर धक्का हा अतिसौम्य प्रकारचा आहे व अशा पद्धतीचे कंपन हे अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत होणाऱ्या पुनर्भरण अथवा उपसा यामुळे निर्माण होणाऱ्या हायड्रोस्टॅटिक दबावामुळे होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आल्याचे डॉ. टी. विजयकुमार यांनी जिल्हा प्रशासनास कळविले आहे. ही सामान्य बाब असून प्रतिवर्षी बऱ्याच भागात असे जाणवते. गूढ आवाज येणे ही स्थानिक स्वरुपातील बाब असल्याचे यापूर्वी देखील निर्दशनास आले आहे. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत तहसीलदार भोकर यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे.

 

तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्ट ने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे तसेच कोणत्याही अफवांनावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जनतेला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!