
नांदेड- कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस दलाला समर्थ साथ देणाऱ्या होमगार्ड जवानांनी मी पोलिसांपेक्षा कमी नाही ही भावना आपल्या मनामध्ये रुजवून वाटचाल करावी,असे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी आज शुक्रवारी येथे बोलताना केले.
नांदेड जिल्हा होमगार्डचे त्रैमासिक संमेलन येथील वामनराव पावडे मंगल कार्यालयात आज पार पडले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.यावेळी प्रशासिक अधिकारी हरिहर अंबेकर,केंद्र नायक संतोष जैस्वाल,समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे,माजी प्रशासिक अधिकारी भगवान शेट्टे,प्रमुख लिपिक शिवकांत घाटोळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना सण,उत्सव काळात तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाला खंबीरपणे साथ देणारे नांदेड जिल्ह्यातील होमगार्ड जवान यांचे काम प्रशंसनीय आहे.होमगार्ड यांच्या प्रत्येक अडीअडचणीची मला जाणीव आहे. त्यांना ३६५ दिवस काम मिळाले पाहिजे, ही माझी देखील भूमिका आहे.
पोलीस भरतीची तयारी करणारे होमगार्ड यांना सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. असे आश्वासन देऊन गुरव पुढे म्हणाले की,प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण अधिक कार्यक्षमतेने प्रामाणिक व निष्ठापूर्वक काम करण्यासाठी आपले मनोबल वाढविले पाहिजे.त्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची असते.कमावलेला पैसा आजारपणामुळे दवाखान्यात खर्च करण्याऐवजी सर्वांनी व्यायाम,योगसाधना आदींचा अवलंब करून शारीरिक फिटनेस कायम सुयोग्य राहील याची काळजी घेतली पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील होमगार्ड यांच्या प्रतिनिधिक स्वरूपात अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत.त्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रमाने प्रयत्न करण्यात येतील.असे अभिवचन देऊ आगामी काळात नांदेड जिल्ह्यातील सर्व होमगार्ड यांनी आपल्या जिल्ह्याची प्रतिमा सबंध महाराष्ट्रात उज्वल राहील.याची खूणगाठ मनाशी बांधून वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले.शिस्तीचे पालन करणारे त्याचबरोबर उत्कृष्टरित्या कामगिरी बजावणाऱ्या होमगार्ड यांचा वेळोवेळी सन्मान करण्यात येईल.तर बेशिस्त होमगार्ड यांच्याविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल.असा इशारा सुरज गुरव यांनी आपल्या भाषणातून दिला.
प्रारंभी होमगार्ड संघटनेचे संस्थापक माजी पंतप्रधान स्व.मोरारजीभाई देसाई,२६/११ च्या हल्ल्यातील शहीद जवान स्व.मुकेश जाधव यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले व दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन सुरज गुरव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र नायक संतोष जैस्वाल यांनी केले.यावेळी समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे,कंपनी नायक डॉ. अनिल पाटील यांची समायोजित भाषणे झाली.जिल्ह्यातील महिला व पुरुष होमगार्ड यांनी अनेक अडीअडचणी व मागण्या आपल्या मनोगतातून मांडल्या.
यावेळी पूर परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनास मोलाचे सहकार्य केलेले केंद्रनायक संतोष जैस्वाल,वरिष्ठ पलटन नायक बशीरोद्दीन शेख तसेच होमगार्ड जवान सय्यद इम्रान अली,शेख फेरोज इमाम,माधव कोमटवार,मादास हिवरे,किशोर कोमटवार,शिवाजी कोकरे,पृथ्वीराज कंधारे,हनुमान घोडके,बालाजी गवंडेल तसेच उत्कृष्ट कामगिरी करणारे संगणक चालक सिद्धार्थ पवार यांना अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक सुरज गुरव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.प्रशासिक अधिकारीपदी पदोन्नती झालेले शिवकांत घाटोळ यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
या संमेलनाचे सूत्रसंचालन कंपनी नायक बलबीरसिंघ चरणसिंघ यांनी केले.संमेलनास समादेशक अधिकारी मधुकर वानखेडे,खंडू खंडेराय,संजय कोंडापलकुलवाड, मष्णाजी पैलावार,राजकुमार कदम,कैलास पाटील,मोहम्मद अनवरोदिन,कंपनी नायक डॉ.अनिल पाटील डॉ.अशोक बोनगुलवार,रामराव क्षीरसागर,सुलतान बेग सत्तार बेग,रवी जेनकुट,बळवंत अटकोरे,भीमराव जोंधळे,अशोक पैलावार,सय्यद वाजीद अली,दीपक काकडे,मारुती तासके,प्रल्हाद एडके,मिलिंद गोडबोले यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य होमगार्ड उपस्थित होते.
