विद्यार्थ्यांनो प्रत्येक क्षण लाख मोलाचा असतो तो ध्येयपूर्तीसाठी खर्च करा – विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप

जीवनसाधना गौरव पुरस्कारासह विविध पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न

नांदेड–“आजचे सत्कारमूर्ती तसेच जीवनसाधना गौरव पुरस्काराचे सन्मानित केलेले जेष्ठ विचारवंत तथा जेष्ठ लेखक शेषराव मोरे हे या वयातही आठरा तास वाचन करतात. आजच्या पिढीला दोन पानेही वाचवीली जात नाहीत. नवीन पिढी वाचन विसरत आहे. त्यांनी ज्येष्ठ विचारवंत, लेखक शेषराव मोरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. आणि वाचणातगोडी वाढवावी कारण प्रत्येक क्षण हा लाख मोलाचा आहे. तो ध्येयपूर्तीसाठी खर्च करा. सामाजिक माध्यमावरील रील्स बघण्यात वेळ वाया घालवू नका”, असे मत नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी व्यक्त केले

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित जीवनसाधना गौरव पुरस्कारासह विविध पुरस्कार वितरण समारंभात ते आज शुक्रवार, दि.१९ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे होते. त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.अशोक महाजन, कुलसचिव डॉ.ज्ञानेश्वर पवार आणि जीवनसाधना गौरव पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती शेषराव बापूराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. संगीता माकोने, अधिसभा सदस्य धनराज जोशी जयभोले, अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, डॉ.डी.एम. खंदारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, आयक्यूएसीचे संचालक डॉ.बी.एस. रेड्डी यांच्यासह इत्तर मान्यवर उपस्थित होते.

यावर्षीचा जीवनसाधना गौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक तथा विचारवंत शेषराव मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रु.पंचवीस हजार, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे. सत्कारास उत्तर देताना ते म्हणाले, “मी जे काही लिखाण केले. त्यापूर्वी त्यावर उपलब्ध असलेले जवळपास सर्वच ग्रंथाचा अभ्यास केला. खोटे लिखाण मी कधीही केलेले नाही. माझ्या लिखाणामध्ये सत्यता आणि तर्क शुद्धता असते. माझे लिखाण सर्वसामान्यांना पटणारे आणि आवडणारे नाही. पण जे काही थोडेफार वाचक आहेत, ते सर्व आवडीने वाचतात. अप्रिय पुस्तक लिहूनही विद्यापीठाने मला जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित केले. याबद्दल मी विद्यापीठाचा आभारी आहे”.

अध्यक्षीय समारोपात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले, “शेषराव मोरे सारख्या ज्येष्ठ लेखकाला विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्कार दिल्यामुळे विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पडली आहे. एवढे प्रतिभावंत व्यक्तिमत्व आपल्या येथे आहे. आणि त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारला हे आपले भाग्य आहे. त्यांचा वाचन आणि लिखाणाचा व्यासंग निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे”.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी पुरस्कार प्राप्त विद्यापीठ परिसरातील व्यंकट रामतीर्थे (उपकुलसचिव), मेघशाम साळुंके (उपकुलसचिव), श्याम डाकोरे (अधीक्षक-लेखा), उद्धव हंबर्डे (वरिष्ठ लिपिक), संतोष हंबर्डे (कनिष्ठ लिपिक), शिवाजी कल्याणकर (सेवक) आणि अशोक कत्तेवार (सुरक्षा रक्षक) तसेच संलग्न महाविद्यालयांमधून मुंजा दुगाणे (वरिष्ठ लिपिक, बी. रघुनाथ महाविद्यालय, परभणी) आणि बालाजी चिखले (प्रयोगशाळा परिचर, शिवाजी महाविद्यालय, उदगीर) यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

वर्धापन दिनानिमित्ताने विद्यापीठाच्या शैक्षणिक नियोजन व विकास विभागामार्फत दिल्या जाणारे उत्कृष्ट तरुण शिक्षक संशोधक पुरस्कार डॉ. विजयकुमार जाधव (श्री शिवाजी महाविद्यालय, उदगीर), डॉ. उषा सांगळे (गणितीयशास्त्र संकुल) यांना देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट महाविद्यालय शहरी विभागाचा लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालय तर उत्कृष्ट महाविद्यालय ग्रामीण विभागाचा लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद, जि. नांदेड यांना देण्यात आला. उत्कृष्ट प्राचार्य ग्रामीण विभागाचा प्राचार्य डॉ. वसंत सातपुते (कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ, जि. परभणी), उत्कृष्ट संकुल संचालक पुरस्कार विभागून डॉ. डी. डी. पवार (संचालक, गणितीयशास्त्रे संकुल) आणि डॉ. डी. एम. खंदारे (संचालक, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुल) यांना देण्यात आला. आणि उत्कृष्ट संकुल शिक्षक पुरस्कार बी.एस. रेड्डी यांना देऊन गौरविण्यात आले.

वर्धापन दिनानिमित्ताने विद्यापीठातील वि‌द्यापीठांतर्गत विभाग मानांकन पुरस्कारामध्ये गणितीयशास्त्रे संकुलास सर्वाधिक आठ, औषधनिर्माणशास्त्र संकुलास चार, जैवतंत्रशास्त्रे संकुलास तीन, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्रे संकुलास दोन, भूशास्त्र संकुलास एक, लातूर उपपरीसरातील टेक्नॉलॉजी संकुलाला एक आणि उपपरिसर, लातूरच्या सामाजिकशास्त्रे संकुलास एक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीताने झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प.पूज्य. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय तसेच आभार प्रदर्शन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!