राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे नाशिक अधिवेशनातील भाषण ऐकले.
नाशिक अधिवेशनात त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. शेतकरी आत्महत्या, गावागावातील जाती जमाती मधील तणाव, पक्षवाढ , इत्यादी.
पण ते कसे साध्य करायचे या बद्दल त्यांनी व्यूह रचना काय असावी याबद्दल सांगितल्याचे आढळले नाही.
हे सगळे प्रश्न ते सोडवू शकतात. यापूर्वीही सोडवलेत. कश्यामुळे? त्यांच्याकडे व्यूह रचना आहे का? तर होय. पण ती व्यक्तिगत. कारण ते जन्मतः एक करिष्मायुक्त charismatic नेते आहेत.आम्ही बाळ ठाकरे, मुंडे, विलासराव,….यासारखे करिष्मायुक्त नेते जवळून पाहिलेत .यांचेकडे जातिवंत शहाणपण होते. न्याय वृत्ती, विशाल दृष्टिकोन, सर्व समावेशकता , समज, संवाद कौशल्य, माणसाबद्दल प्रेम,…., यामुळे त्यांचे अस्तित्व व दिलेला शब्द हा अंतिम असे.
हायस्कूलमध्ये असताना पवार साहेबांच्या प्रचारासाठी ट्रक मधून फिरलो होतो. दिवसभर घोषणा दिल्या. पोटात कावळे ओरडल्यावर लाह्या मुरमुरे खाऊन तांब्याभर पाणी प्याल्याचे आठवते.
आमदार असताना आमच्या मोरगावात कोळ्याच्या हॉटेल मधील कांदाभजी खाल्यानंतर त्याच पागोटे वाल्या शेतकऱ्या बरोबर तंबाखू चोळणारे पवार साहेब पुढे देशातील मोठे नेते बनले. नेता म्हणून प्रचंड मोठं काम केलं. आणि माणूस म्हणून एखादा वसा घेऊन कसे जगावे याचे एक ऐतिहासिक उदाहरण घालून दिले. सरकारी अधिकारी म्हणून त्यांच्याच कार्य काळात काम केल्याने त्यांची कार्यपद्धती मला जवळून पाहता आली.
राजकारण हे व्यक्ती,समाज,देश यावर प्रभाव पाडणारे महत्त्वाचे क्षेत्र आहे.
निवृत्तीनंतर घरात बसून राजकारणावर लंब्याचौड्या गप्पा मारत इतरांना सल्ला देण्याऐवजी काही भूमिका घेऊन मैदानात उतरले पाहिजे. राजकीय व्यवस्था बदलली पाहिजे त्यासाठी त्या व्यवस्थेचा भाग बनले पाहिजे. शिवाय एक भूमिका घेऊन जगले पाहिजे म्हणून निवृत्तीनंतर 2014 साली बारामती मतदार संघातून मी निवडणूक लढविली.
महायुती हा लोकशाही न मानणारा गट असल्याने महाविकास आघाडी उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी त्यापुढील निवडणुकात अनेक नेत्या शेजारी उभे राहून भाषणे ठोकली.
*आता आमच्या बारामती मतदार संघातील मानस बदलली. प्रचारासाठी बाहेर पडलेली आजची पिढी मुरमुरे, शेव रेवडीच्या फार पुढे गेली.पवार साहेबांच्या सारखा करिश्मा आणि चेहरा तयार झाला नाही. शिवाय प्रश्न सोडविण्याची साधने आणि व्यूह रचना तीच राहिली. राष्ट्रवादी तर्फे नुकताच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठा मोर्चा नेला. कडक भाषणे ठोकली. जुन्या प्रश्नांना जुनीच उत्तरे शोधली.
*गेले 2000 वर्ष ब्राह्मणी व्यवस्था राबविणाऱ्या आर्य ब्राह्मणांना ही राज्यघटना व समता बंधुता मान्य नव्हती. सुरुवातीला केलेला विरोध यशस्वी होत नाही हे पाहिल्यावर त्यांनी वरवर राज्यघटना मान्य केली. मालक जमातीचे श्रेष्ठत्व सांगणारे तत्त्वज्ञान व व्यूह रचना त्यांनी मुसोलिनी व हिटलर यांच्याकडून शिकून घेतली. आणि आरएसएस च्या मार्फत ती देशभर पसरविली .त्याद्वारे 2014 साली देशभर आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित केले.
*ब्राह्मण जमातीचा हा कावा आजच्या महाविकास आघाडीतील नेत्यांना समजला नाही की समजला तरी त्याला प्रतिबंध कसा करायचा हे समजलेच नाही.
* राष्ट्रवादी पक्षाचे प्रशिक्षण, संशोधन, मनुष्यबळ विकास, इत्यादी विभाग नसल्यात जमा आहे. जी प्रशिक्षणे होतात ती अगदीच वरवरची. ही अवस्था काँग्रेस, शिवसेना, मनसे या सर्वच पक्षांची आहे. एका व्यक्तीकडे बघून पक्ष उभा राहायचा व चालायचे दिवस संपले. थोडक्यात महाविकास आघाडी हा पॅटर्न कालबाह्य होत चालला आहे.
* पन्नास वर्षांपूर्वी मोठ्या शहरात किराणा मालाची भव्य दुकाने होती. त्यात ठेवलेल्या किराणामाला प्रमाणेच दुकानाचा मालक/ शेठ बसलेला ठळकपणे दिसायचा. शेठ नसेल तर कुटुंबातील कुणीतरी व्यक्ती,तीही नसेल तर एखादा विश्वासू नोकर असे.आता शहरात मोठमोठाले मॉल दिसतात, चकचकीत जागेत व्यवस्थित मांडलेल्या वस्तू,तसेच गोड गोड बोलणारी तुरुतुरु चालणारी पोरे पोरी दिसतात. शेठ कुठेच दिसत नाही. ती सर्व आधुनिक व्यवस्थापन पद्धतीवर चालतात. राजकीय पक्ष या पद्धतीने बदलले पाहिजेत.महा विकास आघाडीतील हे पक्ष बदलायला मागत नाहीत.
* किराणा दुकानाच्या चाव्या हातात आल्या की विश्वासू नोकरदार पोरे, कुटुंबातील भाचे पुतणे गल्ल्यातील पैसे ढापतात. तिजोरी आणि दुकानाचा सातबारा घेऊन पळून जातात. त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे, अजित दादा, अशोक चव्हाण ही कुटुंबातील पोरे तिजोऱ्या घेऊन गायब झाली. थोडक्यात महाविकास आघाडीतील पक्ष कालबाह्य झालेले आहेत. ते सुधारणे अवघड आहे पण अशक्य मुळीच नाही.
* मलाच फार अक्कल आहे असा माझा दावा नाही. ती कशी बदलता येऊ शकते याबद्दल या अनेक पक्षांच्या काही नेत्यांना व प्रमुख प्रवक्ते यांना प्रत्यक्ष भेटून व लेखी देऊन चर्चा केली. निव्वळ चेहरे नको व्यवस्था बदलूया अशी मी शिफारस केली होती. ती कशी बदलायची याबद्दल नवी दिशा व तिसरी क्रांती या पुस्तकाद्वारे मांडणी केली आहे. असो .
आमच्या काळातील या बलाढ्य, करिष्मायुक्त, जननायकांनी उभे केलेले कार्य पुढे चालवायचे असेल तर त्यांच्या आजच्या वारसांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे
’या निसर्गातील सगळ्या गोष्टी मर्त्य आहेत .
मात्र बदल हा अमर आहे! ’
–सुरेश खोपडे
