नांदेड(प्रतिनिधी)-परतीच्या पावसाने पुन्हा नागरीकांना भरपूर झोडपून काढण्याचे काम सुरूच ठेवले आहे. सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. ज्यांची घरे कच्चा स्वरुपाची आहेत. त्यांना रात्र-रात्र झोप येत नाही. म्हणजे पावसाच्या दहशतीत जीवन सुरू आहे. जायकवाडी प्रकल्पाचे बरेच दरवाजे उघडे आहेत. नांदेड येथील विष्णुपूरी प्रकल्पाचे जवळपास 16 दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरीही एक छान झाले तेलंगणा राज्यात पाऊस नाही. त्यामुळे त्या पावसाने तयार होणारे बॅक वॉटर तयार होत नाही. नाही तर नदीमधील पावसाचा फुगवटा झाला असता आणि त्रास त्रास वाढला असता.
असे म्हणतात पोळा आणि पाऊस झाला भोळा पण यंदा काही पाऊस भोळा होण्याच्या मार्गावरच दिसत नाही. जोरदारपणे पर्जन्यवृष्टी सुरू आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस कायमच आहे. जायकवाडी प्रकल्पातील जवळपास 25 दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे तेथून होणारा मोठा विसर्ग हा पुढे नांदेडलाच येतो. त्यामुळे नांदेड येथील विष्णुपूरी प्रकल्पाचे दरवाजे सुध्दा मोठ्या संख्येत सुरू आहेत आणि त्यामुळे नांदेडच्या खालच्या भागात गोदावरी काठी राहणाऱ्या नागरीकांचा त्रास जास्त आहे.
शहरात गोवर्धनघाट, मरघाट या ठिकाणी प्रेत जाळण्याची सुविधा उपलब्ध नाही. कारण प्रेत जाळण्याच्या जागा पाण्याच्या विसर्गाने पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे नांदेड शहरातील नागरीकांना आपल्या कुटूंबात झालेल्या मृत्यूनंतर ते प्रेत सिडको स्मशानभुमीत न्यावे लागत आहे आणि यामुळेच ती वेगळीच एक नवीन परिस्थिती तयार झाली आहे. थोडा वेळ उन दिसते आणि लगेच पाऊस सुरू होतो त्यामुळे रोगराई वाढत आहे आणि दवाखाने गच्च भरलेले आहेत. देवा थांबवरे आमचा त्रास असेच म्हणण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत अवघड आहे. कापसाचे बोंड काळे झाले आहेत. हळदी जमीनीखाली असते. सध्या सर्व शेत पावसाने भरलेले आहे. म्हणून हळदीची परिस्थिती काय आहे हे कळायला मार्ग नाही.
देवा पावसाला थांबव रे…
