शेषराव बापूराव मोरे यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’
नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ देण्यात येत असतो. सन २०२५ चा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ हा मुखेड तालुक्यातील जांब बु. येथील अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनेचे माजी शासकीय अधिव्याख्याता शेषराव बापूराव मोरे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु.पंचवीस हजार, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह आहे.
राज्य व राष्ट्रीय पातळीवर कला, संस्कृती, साहित्य, शास्त्र, क्रीडा, शिक्षण व संशोधन, सामाजिक कार्य, कृषी, उद्योग व व्यापार, आदी. क्षेत्रामध्ये स्वतः वाहून घेणाऱ्या व त्या क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस जीवन साधना पुरस्काराने गौरविण्यात येते. त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये वरीलपैकी कोणत्याही एका क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या व्यक्तीस ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार, देवून सन्मानित करण्यात येते. शेषराव मोरे यांनी २०१५ साली अंदमान येथे अ. भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे भरणाऱ्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविलेले आहे. आत्तापर्यंत त्यांची १५ ग्रंथ संपदा प्रकशित झालेली असून तीन प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. यापैकी अनेक ग्रंथांना शासनाचा पुरस्कारासह अन्य पुरस्कार प्राप्त झालेली आहेत.
याचबरोबर शहरी आणि ग्रामीण उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, तरुण शिक्षक संशोधक पुरस्कार जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये शहरी विभागातील उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालय तर उत्कृष्ट महाविद्यालय ग्रामीण विभागासाठी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद, जि. नांदेड यांची निवड करण्यात आलेली आहे. ग्रामीण विभागातील उत्कृष्ट प्राचार्य म्हणून सोनपेठ, जि. परभणी येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देविदासराव सातपुते यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. उत्कृष्ट तरुण शिक्षक संशोधकासाठी महाविद्यालयीन शिक्षकांमधून उदगीर येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. विजयकुमार विनायकराव जाधव यांची तर विद्यापीठ परिसरातील उत्कृष्ट तरुण शिक्षक संशोधकासाठी गणितीयशास्त्र संकुलातील डॉ.उषा सांगळे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
‘जीवनसाधना गौरव पुरस्कार-२०२५’ आणि इतर उत्कृष्ट पुरस्कारांचे वितरण दि.१९ सप्टेंबर रोजी विद्यापीठामधील नियोजित कार्यक्रमामध्ये होणार आहे, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी कळविले आहे.
