नांदेड(प्रतिनिधी)-दि.13 सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात जॉब फेअरचे नियोजन करण्यात आले असून नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी केले आहे.
आज पत्रकारांशी बोलतांना डॉ.मनोहर चासकर यांनी ही माहिती सांगितली. याप्रसंगी कुलसचिव डॉ.डी.डी.पवार, प्र.कुलगुरु डॉ.अशोक महाजन, जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ.चासकर सांगत होते की, ऍस्पार नॉलेज या कंपनीसोबत नियोजन करून विद्यार्थ्यांसाठी जॉबफेअरचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी 5 हजार 300 नोंदणी केल्या आहेत. आम्हाला विविध कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 3 हजार पेक्षा जास्त जागा रिकाम्या आहेत. कोणत्या भागात काम आहे, त्यानुसार विद्यार्थी निवड करू शकतील. याचीही माहिती कंपन्यांनी आमच्याकडे दिली आहे. आजपर्यंत ही नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना सुध्दा अजून नोंदणी करता येईल. विद्यापिठाच्या कक्षेत येणाऱ्या लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी या जॉबफेअरचा फायदा घ्यावा असे आवाहन कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी केले.
17 सप्टेंबर हा दिवस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचा वर्धापन दिन असतो. तसेच त्या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्रामदिन पण असतो. विद्यापिठाचा वर्धापन दिन 31 वा आहे. आणि मुक्ती संग्राम दिन 78 वा आहे. या दोघांची बेरीज केल्यानंतर 109 हा आकडा येतो. यावर कुलसचिव डॉ.डी.डी. पवार यांनी सांगितले की, त्या दिवशी 109 वृक्षांचे रोपण होणार आहे. तसेच 11 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर असे विविध कार्यक्रम या दोन विशेष दिनांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत.
पत्रकारंाच्या प्रश्नांना उत्तर देतांना कुलगुरू डॉ.चासकर म्हणाले मला कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव कधी आला नाही. आजपर्यंत मी दहा महाविद्यालयाना तुमचे प्रवेश घेण्याचे अधिकार का रद्द करू नयेत अशी नोटीस दिल्याचे सांगितले. महाविद्यालयामध्ये विद्यार्थी, विद्यार्थींनीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
13 सप्टेंबरच्या जॉब फेअरमध्ये सहभागी व्हा-कुलगुरू डॉ.चासकर
