महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीचे 13 ते 16 सप्टेंबर कालावधीत एकत्रीकरण

*17 सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी सर्व सेवा सुरळीत* 

 

नांदेड:– अर्थमंत्रालय तथा वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार यांच्या मार्फत 7 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानूसार, तत्कालीन महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या बँकांचे एकत्रीकरण होऊन 1 मे 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन महाराष्ट्र ग्रामीण बँक अस्तित्वात आली आहे. पूर्वी प्रमाणेच महाराष्ट्र ग्रामीण बँक हि संपूर्ण शासकीय मालकीची बँक असून या बँकेचे भागभांडवल हे भारतसरकार, महाराष्ट्र राज्य सरकार व बँक ऑफ महाराष्ट्र यांचे आहे

 

या एकत्रीकरणाच्या अनुषंगाने, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या संगणकीय प्रणालीचे म्हणजेच कोअर बँकिंग सेवा प्रणालीचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोअर बँकिंग सेवा प्रणाली सोबतची एकत्रीकरण प्रक्रिया 13 ते 16 सप्टेंबर, 2025 पर्यंत नियोजित करण्यात आलेली आहे. या एकत्रीकरण प्रक्रियेच्या कालावधीत सर्व डिजिटल व इतर बँकिंग सेवा जसे की एटीएम, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, युपीआय, आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, डीबीटी, व्हीकेवायसी, आधार आधारित पेमेंट प्रणाली, धनादेश वटविणे, स्थायी सूचनांसह नियत आदेश या सर्व सेवा कालावधीत तात्पुरत्या विलंबित किंवा खंडित होऊ शकतात. ही एकत्रीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व सेवा पुन्हा पुर्ववत सुरू होतील.

 

या मुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल बँक दिलगीर आहे असे बँकेच्यावतीने कळविण्यात आले आहे. तसेच वरील कालावधीत येणाऱ्या तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी पूर्व नियोजित व्यवस्था करण्याची ग्राहकांना नम्र विनंती बँकेच्या मार्फत करण्यात येत आहे. कृपया कोणतीही अडचण, शंका किंवा तक्रार असल्यास बँकेच्या नजीकच्या शाखेशी अथवा www.mahagramin.in या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा. महाराष्ट्र ग्रामीण बँक आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. 17 सप्टेंबर पासून सर्व सेवा ग्राहकांसाठी पुन्हा सुरळीत होतील व त्या अधिक तत्पर व ग्राहकांसाठी अधिक सोयीच्या असणार आहेत असे नांदेड महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक नरेंद्र न. खत्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!