एससीओ च्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधताना जोरजोरात हसताना दिसलेले फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बहुधा मोदींना चिनी आणि रशियन भाषा येत असाव्यात, म्हणूनच त्यांनी त्या संवादात उत्कृष्टपणे भाग घेतला असावा, असा कयास लावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रचार सुरू झाला की डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे कारण जेव्हा मोदी ट्रम्पना भेटतात तेव्हा चीन अस्वस्थ होतो, आणि जेव्हा मोदी चीनला भेटतात, तेव्हा अमेरिका अस्वस्थ होते. अशा प्रकारची स्वप्ने पाहणाऱ्यांना ती नेमकी कशी दिसतात, हा एक मोठा प्रश्न आहे.यासोबत काही ठिकाणी अशा प्रकारच्या हेडलाईन्सही झळकल्या की “पाकिस्तानला भावच दिला नाही”, “त्याच्याकडे पाहिलेच नाही”, “त्याला झिडकारले” इत्यादी. मोदी भारतात परतल्यानंतर, पाच दिवसांनी कळाले की त्यांच्या आईबद्दल कोणी वाईट बोलले होते. त्या व्यासपीठावर काँग्रेस किंवा राष्ट्रीय जनता दल यांचा कोणताही नेता उपस्थित नव्हता. एका कार्यक्रमात, पंचरवाल्याने माईक हातात घेऊन हा प्रकार घडवला, मात्र त्याचे रूपांतर राष्ट्रीय मुद्द्यात करण्यात आले.
पत्रकार अशोक वानखेडे आपल्या “एक्स-रे” या कार्यक्रमात सांगतात की, “आम्हाला वाटले की भारताचे पंतप्रधान रशियासारख्या महत्त्वाच्या देशातील नेत्यांना भेटून आले आहेत, म्हणजे भारतासाठी काही महत्त्वाचे मिळवून आणले असतील. मात्र तसे काही विशेष मिळाले नाही, म्हणूनच त्यांनी आईचा उल्लेख केला.”भारताला तिथे काही मिळाले नाही, हे वेगळे; पण आमचा शत्रू पाकिस्तान काहीतरी मिळवून गेला, ही अधिक चिंतेची बाब आहे. म्हणूनच अशोक वानखेडे म्हणतात की, “मी या सगळ्या घटनांना एक्स-रेच्या माध्यमातून पाहत आहे.”
बीबीसी हिंदीने दिलेल्या एका बातमीनुसार, नरेंद्र मोदी चीनमधून परत आल्यावर, रशियाचे राष्ट्रपती पुतीन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट झाली. या बैठकीत शरीफ म्हणाले की, “ते भारत-रशिया संबंधांचा सन्मान करतात, पण पाकिस्तानही रशियासोबत मजबूत संबंध प्रस्थापित करू इच्छितो.” यावर पुतीन यांनी डोके हलवत संमती दर्शवली.काही विश्लेषक सांगतात की, पुतीन कोणत्याही एका देशाशी बांधील नाहीत. त्यांनी शहबाज शरीफ यांच्यासोबत स्पष्टपणे सांगितले की, रशियाला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत.या बैठकीत द्विपक्षीय सहकार्य, व्यापारवाढ, आणि शरीफ यांना मास्कोला येण्याचे आमंत्रण याबाबत चर्चा झाली. शरीफ यांनी दक्षिण आशियामधील संतुलित धोरणाबद्दल रशियाचे आभार मानले.
मात्र प्रश्न असा आहे की, “पाकिस्तान खरोखरच रशियाचा पारंपारिक भागीदार आहे का?” अनेक विश्लेषक म्हणतात की, ऐतिहासिकदृष्ट्या पाकिस्तान कधीच रशियाचा पारंपारिक भागीदार नव्हता. आज पुतीन पाकिस्तानला पारंपारिक भागीदार म्हणत असले, तरी इतिहास पाहता हे विधान चुकीचे ठरते.जर रशिया-पाकिस्तान मैत्री वाढली, तर ती भारतासाठी धोकादायक ठरू शकते. भारताचा प्रयत्न नेहमीच असा राहिला आहे की, रशियाचे संबंध चीनपेक्षा भारताशी अधिक दृढ असावेत. मात्र सध्याच्या घडामोडींवरून चीन आणि रशिया दोघेही पाकिस्तानचे व्यावसायिक भागीदार झाले आहेत.
विश्लेषकांच्या मते भारतासाठी सर्वात मोठा धोका म्हणजे, रशिया, चीन आणि पाकिस्तान हे तिघे एकत्र येणे. चीन आणि रशिया यांचे संबंध आधीपासूनच मजबूत आहेत. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानही रशियाने आपली भूमिका संतुलित ठेवली होती. अमेरिका मात्र भारत-रशिया मैत्रीबद्दल सतत चिंतित राहिलेला आहे.अनेक विश्लेषक सांगतात की, अमेरिका भारतावर दबाव टाकते की त्याने रशियाशी असलेली मैत्री कमी करावी. जर तसे झाले, तर कृतीत रशिया अधिक ताकदवान होईल. पण याचा फारसा परिणाम पुतीनवर होताना दिसत नाही. काहीजण म्हणतात की, ट्रम्प भारतावर दबाव आणतील, आणि त्याचा फायदा पुतीन घेतील.
सोविएत युनियन अस्तित्वात असताना किंवा नंतरही, कोणीच पंतप्रधान पाकिस्तानमध्ये गेले नव्हते. पण भारतात ट्रम्प सरकार यावे म्हणून यज्ञ, अनुष्ठान, आणि “अबकी बार, ट्रम्प सरकार” असे नारे दिले गेले. त्यामुळे पुतीनही चिंतेत आले, आणि त्यांनी आपला विस्तार वाढवायला सुरुवात केली.आज परिस्थिती अशी आहे की, अमेरिकेशी जे विश्वासाने व्यवहार चालायचे, ते आता जवळपास संपले आहेत. विदेशनीती ही पारंपरिक असते, ती वारंवार बदलली जात नाही. पण मागच्या ११ वर्षांत भारताची भू-राजकीय विदेशनीती झपाट्याने बदलली आहे आणि अनेकांच्या मते, ती दिशा चुकीची आहे.नवीन विदेशनीतीमुळे भारत अमेरिकेच्या पायात जाऊन बसले आहे आणि रशिया भारतापासून अधिक दूर गेला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे, चीन आणि रशियासारखे देश भारताच्या शत्रूंना (पाकिस्तानसारख्यांना) अधिक बळकटी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या परिषदेत सर्वात मोठा फायदा पाकिस्तानला झाला आहे. पाकिस्तान आता अमेरिकेचा आणि रशियाचाही मित्र बनला आहे. रशियाने पाकिस्तानला स्टील प्लांटसाठी २०,००० कोटी रुपयांची मदत केली आहे. सोबतच, रशियाची टर्कीपर्यंत रेल्वे लाईन टाकण्याची योजना देखील सुरू आहे.अशा स्थितीत भारत रशियाशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असला, तरी रशिया पाकिस्तानला सोडणार का, हा मोठा प्रश्न आहे. चीनच्या माध्यमातून रशिया पाकिस्तानकडे झुकलेला दिसतो आहे. आणि ही जागा पाकिस्तानसाठी मोकळी करून देण्यात आमच्या नेत्यांचाही मोठा वाटा आहे.विदेशनीती ही पारंपरिक असते, तिला छेडछाड केली जात नाही. पण भारतात आर्थिक आणि विदेशनीती दोन्हींत हस्तक्षेप झालेला दिसतो. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांना असे वाटते की, त्यांच्या शिवाय जगात कोणीही नाही. स्वतःला “विश्वगुरू” सिद्ध करण्याच्या नादात त्यांनी देशाच्या धोरणांना आणि परराष्ट्रसंबंधांना फटका दिला आहे.जपान, चीन आणि रशियाच्या दौऱ्यांनंतर भारताची स्थिती झिरो होत चालली आहे.
