नांदेड,(प्रतिनिधी)-ओबीसी कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा नांदेड तर्फे आयोजित ओबीसी भूषण पुरस्कार सोहळा व ओबीसी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी, रविवार सकाळी ११.०० वाजता हॉटेल विश्राम, नाना–नानी पार्क शेजारी, शिवाजीनगर, नांदेड येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या सोहळ्यात समाजातील थोर व्यक्तिमत्त्व, समाजप्रबोधन व सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले स्व. भानुदास परशुराम यादव यांना मरणोत्तर “जिल्हा ओबीसी भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या समाजकार्य, शिक्षणप्रसार, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
स्व. भानुदास यादव यांचे दोन सुपुत्र असून त्यातील गजानन भानुदास यादव न्यायाधीश पदावर कार्यरत आहेत, तर डॉ. प्रा. कैलाश यादव हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कार्याने आणि यशाने त्यांनी वडिलांच्या सामाजिक परंपरेला पुढे नेले आहे.
या कार्यक्रमात ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव, सत्कार तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचे योगदान अधोरेखित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार आणि सोहळा केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण ओबीसी समाजासाठी आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यातील यादव-गवळी समूहासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे.
स्व. भानुदास यादव यांचे विचार व कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, हीच खरी श्रद्धांजली
