अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : पालकमंत्री अतुल सावे

• *जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीचा घेतला आढावा*

नांदेड- नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करुन अहवाल शासनाकडे सादर करावा. जेणेकरुन नुकसानग्रस्तांना तातडीने नुसान भरपाई देण्यात येईल, असे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

 

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रविंद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

पालकमंत्री अतुल सावे यांनी कृषी, आरोग्य, जलसिंचन, बांधकाम, पुशसंवर्धन, विद्युत, महानगरपालिका विभागांच्या अधिकाऱ्यांकडूनही जिल्ह्यातील परिस्थिती विषयी माहिती जाणून घेऊन या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याची सूचना केली. पावसामुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत. यासोबतच इतर नुकसानीचेही पंचनामे करुन शासनाकडे अहवाल सादर करावा. याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी घेऊन तातडीने नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल. आरोग्य विभागाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. विशेषत: साथरोग पसरु नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नगरपालिका व महानगरपालिकेने शहरात आरोग्याच्याबाबत दक्षता घ्यावी. बांधकाम विभागाने पावसामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांचे सर्वेक्षण करुन तात्काळ दुरूस्ती करावी. पशुसंवर्धन विभागाने मृत झालेल्या जनावरांचे पंचनामे करावेत. विद्युत विभागाने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करावा. जलसंपदा विभागाने हवामान खात्याचे अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ज्यांच्या घरामध्ये पुराचे पाणी जाऊन नुकसान झाले आहे त्यांनाही नुकसान भरपाई दिली जाईल, असेही पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीचा 5 टक्के निधी हा आपत्ती व्यवस्थापनासाठी राखीव ठेवण्यात येतो. त्याअनुषंगाने प्रस्ताव तयार करुन शासनाकडे मान्यतेसाठी पाठवावा, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान नांदेड शहरात, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना नृसिंह विद्यामंदिर हायस्कुल श्रावस्तीनगर येथे स्थलांतरीत केले आहे. याठिकाणी पालकमंत्री अतुल सावे यांनी भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!