आरएसएस प्रमुख मोहनजी भागवत यांची तीन दिवसीय व्याख्यानमाला पूर्ण झाली. या व्याख्यानमालेसाठी अनेक राजदूत,त्यात विशेषतः मुस्लिम देशांतील राजदूत, बुद्धिजीवी, प्राध्यापक, वैज्ञानिक, विद्यार्थी, वर्तमानपत्रांचे मालक व संपादक यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच एनडीए गटातील प्रत्येक राजकीय पक्षालाही निमंत्रण देण्यात आले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेतून अनेक प्रश्न सुटले आणि काही नवे प्रश्न समोर आले. या व्याख्यानमालेचे विश्लेषण पत्रकार अशोक वानखेडे यांनी त्यांच्या ‘एक्स-रे’ या कार्यक्रमातून सादर केले.त्यांना असं दिसून आलं की मोहनजी भागवत हे मान्य करतात की संघ आणि सत्ताधारी पक्षामध्ये काही अंतर्गत विसंवाद आहे, तरीही ते म्हणतात की ‘सर्व काही ठीक आहे’. त्यांना विचारण्यात आलं की भारतीय जनता पक्षाचा (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष आरएसएस ठरवतो का? यावर भागवत यांनी उत्तर दिलं:
“जर आम्ही अध्यक्ष ठरवणारे असतो, तर इतका वेळ लागला असता का? आम्हाला अध्यक्ष ठरवायचा नाही. ज्यांना ठरवायचा आहे, त्यांना माहीत. पाहूया, ते किती वेळ घेतात.”
या उत्तरावरून असं सूचित होतं की कुठे तरी गोंधळ किंवा दिरंगाई नक्कीच आहे.सध्या भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष वाढीव कार्यकाळात काम करत आहे. कार्यकाळ संपून अडीच वर्षे झाली आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत अनेक कारणं सांगितली जात आहेत. कोण म्हणतं “ऑपरेशन सिंदूर”मुळे ती थांबली आहे, तर कोण म्हणतं बिहारमधील निवडणूकांमुळे निवड होत नाही.आजही हे स्पष्ट झालेलं नाही की भाजपचा नवा अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवडला जाईल, की बिहार निवडणुकीनंतर, की आणखी एक-दोन वर्षे वाढीव मुदतीतच चालेल. अध्यक्षपदाच्या निवडीत होणारा उशीर आरएसएसचा वचक कमी झाल्याचंही सूचित करतो.जेव्हा मोहन भागवत यांना संघ आणि सरकारमधील संबंधांबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं:”आम्ही शाखा चालवण्यात तज्ज्ञ आहोत. मी पन्नास वर्षांपासून शाखा चालवत आहे. ते लोक सरकार चालवण्यात तज्ज्ञ आहेत. आम्ही आपलं काम करतो, ते त्यांचं काम करतात. आम्ही एकमेकांना सूचना देऊ शकतो, पण ते आमच्या कामात हस्तक्षेप करणार नाहीत आणि आम्ही त्यांच्या कामातही हस्तक्षेप करणार नाही. संघर्षच सर्व काही ठरवतो, ही संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे.”
त्यांना पुन्हा विचारण्यात आलं, सरकारबरोबरचे संबंध कसे आहेत?त्यावर त्यांनी उत्तर दिलं:”आमचे संबंध प्रत्येक सरकारसोबत चांगलेच असतात. मात्र, अंतर्गत वाद असतात. आमचे आणि त्यांचे गोल एकच आहेत, पण विचार पद्धती वेगळी आहे. त्यामुळे वाद होतात. पण त्यातून सामंजस्य शोधलं जातं. वादातूनही मार्ग निघतो.”ते पुढे म्हणाले:”संघातही संघर्ष असतो. माझं आणि दत्ताजींचंही कधी मतभेद असू शकतात. मी काही सांगितलं तर आमचं मानलं जाईल, किंवा दत्ताजी सांगतील ते मान्य केलं जाईल. पण आम्ही बसून बोलतो. मतभेद असले तरी मनभेद नाहीत. आम्ही एकत्रितपणे विचार करतो.”यानंतर अशोक वानखेडे म्हणतात की, मोहनजी भागवत हे यामधून ‘एकत्रित निर्णय प्रक्रिया हवी’ आहे, हे सूचित करत आहेत.
२०१४ नंतर भाजपच्या संघटनेत आणि पक्षात मोठा फरक जाणवतो. आमदारांना मुख्यमंत्री कोण होणार हे माहीत नसतं, विचारणं तर दूरच. उदाहरण द्यायचं झालं तर राजस्थानात, जेव्हा राजनाथ सिंह यांनी वसुंधरा राजे यांच्या हातात चिठ्ठी दिली, त्यात भजनलाल शर्मा यांचं नाव होतं. वसुंधरा राजे यांचे चेहेरे पाहण्यासारखे झाले होते. भजनलाल शर्मा यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती आणि थेट मुख्यमंत्री म्हणून त्यांची घोषणा झाली.अशा प्रकारच्या घटनांमुळे हे स्पष्ट होतं की अनेक राज्यांमध्ये एकत्रित निर्णय होत नाहीत. हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा सगळीकडे हेच चित्र आहे.त्याचप्रमाणे, नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्यात मतभेद आहेत की मनभेद, हेही समजत नाही. गडकरी यांचं नाव भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डवर नाही, त्यांना निरीक्षकपदही दिलं जात नाही. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांना विचारलंच गेलं नाही.म्हणून प्रश्न उभा राहतो. हे सगळं ‘एकत्रित निर्णय’ आहेत की ‘एकहाती निर्णय’ घेतले जात आहेत? भाजपमध्ये आता एकहाती निर्णयप्रक्रिया प्रस्थापित होत आहे का? आणि त्यामुळेच भाजप आणि आरएसएस यांच्यात दुरावा निर्माण होतो आहे का?
मोहनजी भागवत यांच्या भाषणात प्रश्न होते, टोले होते, आणि समजही होती. विशेषतः अध्यक्षपदाविषयी दिलेलं उत्तर हे सूचित करतं की, आता संघाने दोन्ही गुजराती नेत्यांवर अध्यक्षपदाची निवड सोडून दिली आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्यानंतर जो झटका बसला, त्यातून अजून दोघेही सावरलेले नाहीत. म्हणूनच अध्यक्षपदाची निवड होत नाही.मोहन भागवत यांनी आरसा दाखवला, टोले मारले आणि समजही दिली. पण ज्यांना हे ऐकायला हवं, ते ऐकायला तयार आहेत का, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. अशोक वानखेडे यांना भीती वाटते की मोहन भागवत यांच्या बोलण्याचीही विनोदात रूपांतरण होईल.
