नांदेड(प्रतिनिधी)-परतीचा पाऊस झोडपत असून सर्वत्र हाहाकार माजत आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार आणि नायगाव या चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेडच्या विष्णुपूरी प्रकल्पासह श्रीरामसागर प्रकल्प आणि सुधा प्रकल्पाची दारे उघडल्यामुळे त्याचाही प्रकोप सुरू आहे.
असे म्हणतात पोळा आणि पाऊस झाला भोळा परंतू श्री गणेशजीच्या आगमनासोबत पावसाने आपली उपस्थितीची नोंद घेण्यास भाग पाडले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा जास्त पाऊस आजपर्यंत झाला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत बिलोली, मुखेड, कंधार आणि नायगाव या चार तालुक्यातील 17 महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. निझामसागर धरणाचे सकाळी 24 दार उघडले आहेत. त्यातून 1 लाख 99 हजार 244 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. श्रीरामसागर प्रकल्पाचे 39 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून 2 लाख 76 हजार क्युसेक्स वेगाने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदेड शहरातील विष्णुपूरी प्रकल्पाचे चार दार उघडण्यात आले आहेत. त्यातून 50 हजार 145 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, देगलूर या तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या काठी राहणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरीकांनी जास्तीचे धाडस करू नये अशी विनंती वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा करत आहे.
