नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीचा खून झाला. त्याच्यासोबत भांडण करतांना काही वेळापुर्वी पाहणारा व्यक्ती आणि असाच एक शेवटच्या नजरेतील व्यक्तीच्या दुसऱ्या साक्षीच्या आधारावर पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश नांदेड यांनी एका 25 वर्षीय युवकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
दि.14 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास सय्यद गौस सय्यद मियॉ हसनजी (55) हे व्यक्ती केळी मार्केटमधील आपल्या महानगरपालिकेच्या दुकानात मृतअवस्थेत सापडले. त्यांच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने चिरल्याचे व्रण होते. त्यांचा पैसे ठेवण्याचा गल्ला सुध्दा रिकामा होता. तेंव्हा मयत सय्यद गौस यांचे मेहुणे महम्मद जावेद अब्दुल जलील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात माणसाने त्यांचे भाऊजी सय्यद गौस यांचा खून करून 10 हजार रुपये चोरून नेल्याच्या सदरात गुन्हा क्रमांक 111/2016 दाखल करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलम 302, 394 आणि 34 जोडलेली होती. या प्रकरणाचा तपास इतवारा येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.बी.आव्हाड यांनी केला आणि छोट्याशा माहितीवरून मारेकरी शिवशंकर अशोकराव बिरादार (25) रा.माळेगाव ता.देगलूर ह.मु.लाडगल्ली इतवारा यास पकडले.
पोलीसांच्या माहितीप्रमाणे ज्या ठिकाणी सय्यद गौस यांचा खून झाला. त्या दुकानापासून 30 ते 40 फुट अंतरावर असलेल्या एका भजे विक्रेत्याने एका युवकाला त्या ठिकाणावरून पळून जातांना पाहिले होते. पळून जातांना तो घाईत होता आणि त्याच्याकडे धारधार हत्यार पण होते. अशाच पध्दतीने दुसऱ्या एका व्यक्तीने त्या दुकानात मयत सय्यद गौस आणि मारेकरी शिवशंकर बिरादारमध्ये भांडण होत असतांना पाहिले. न्यायालयात या प्रकरणी सात साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे पहिल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सय्यद गौसचा खून करणाऱ्या शिवशंकर बिरादारला जन्मठेप आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. रणजित देशमुख यांनी सरकारपक्षाचे काम पाहिले. इतवाराचे पोलीस निरिक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार बालाजी लांबतुरे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पुर्ण केली.
