नांदेड,(प्रतिनिधी)- गणपती बाप्पाच्या आगमनानंतर नांदेडमध्ये कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर हराळी, आघाडा, केळीची पाने आणि इतर हिरव्या वस्तू विक्रीसाठी अनेक गावकरी नांदेडमध्ये आले होते. मात्र, काल संध्याकाळपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे हे विक्रेते आपले साहित्य तसेच टाकून परत गेले आहेत. आज सकाळीही या ढिगाऱ्यांची कोणतीही स्वच्छता करण्यात आलेली नव्हती.

या सडलेल्या हिरव्या पानांमुळे दुर्गंधी पसरू लागली असून, रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही अजून पर्यंत ही ढिगारे उचललेली नाहीत. पावसामुळे संपूर्ण परिसर ओलाचिंब झाला असून, त्याठिकाणी कुजण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचे सावट आहे. तेलंगणामध्येही जोरदार पावसामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले असून, काही रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. देगलूर ते उदगीर जाणारा मार्ग बंद झाला आहे. देगलूर तालुक्यातील अनेक नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, पाण्याची आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी धरणाची दारे उघडण्यात येऊ शकतात. त्यामुळे नदीपात्रात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.या परिस्थितीचा वाळू माफियांनी मात्र फायदा घेण्याची शक्यता आहे, कारण नदीपात्रात नवी वाळू साचण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना मात्र या पावसाचा तगडा फटका बसत आहे.प्रवाशांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे, कारण तेलंगणामधून येणाऱ्या काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तसेच काही रस्तेही बंद झाले आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी आवश्यकता असल्यास अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
