नांदेड,( प्रतिनिधी)–आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. याच शुभदिनी गणपती बाप्पांचे आगमन होते आणि पुढील दहा दिवस संपूर्ण जगात उत्सवाचे वातावरण निर्माण होते. यंदाच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी, सूर्योदयापूर्वीच पावसाने हजेरी लावली. सकाळपासून दिवसभर पावसाची हलकीसरशी चालू होती, मात्र सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले.

तरीदेखील, “गणपती बाप्पा मोरया!” च्या जयघोषात संपूर्ण नांदेड शहर दुमदुमत होते. मागील तीन दिवसांपासून बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. गणेश मूर्ती, सजावटीसाठी लागणारे साहित्य, फुले, हार-तुरे आणि पूजेचे सामान यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती.
सकाळपासूनच विविध गणेश मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढत आपल्या मंडळाच्या गणेश मूर्ती मंडपांमध्ये पोहोचवल्या. तेथे आरती पार पडली आणि दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची अधिकृत सुरुवात झाली.
घरोघरी सुद्धा गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली. महिलावर्ग, लहान मुले, तरुण आणि वृद्ध मंडळी गणपती खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारात गर्दी करत होते. दुपारी बारा वाजता घराघरांत आरती करण्यात आली आणि प्रसाद वितरण झाले.
सायंकाळी पावसामुळे बाजारपेठांतील गर्दी कमी झाली. बहुतांश गणेश मंडळांनी मूर्तींची स्थापना पूर्ण केली असली, तरी काही मंडळांच्या मूर्ती अद्याप मार्गावर आहेत आणि रात्री उशिरा मंडपात पोहोचण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक मंडपांमध्ये देखील आरतीनंतर प्रसाद वितरण होत आहे आणि नागरिक त्याचा आनंद घेत आहेत. शहरात सर्वत्र आनंद, उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

