नांदेड – जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी भाविकांना दिला जाणारा प्रसाद स्वच्छ व सुरक्षित राहावा यासाठी आवश्यक त्या खबरदारी घेणे बंधनकारक असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व गणेश मंडळांनी भाविकांसाठी तयार केलेला प्रसाद हा काचेच्या, स्टेनलेस स्टीलच्या भांडयात किंवा पारदर्शक अन्न श्रेणी प्लॉस्टीकच्या भांडयात झाकुन ठेवावा. जेणेकरुन प्रसादाला धुळ, माती, माशा, मुंग्या या इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. भाविकांना शिळे अन्न पदार्थ सेवनास देऊ नयेत. प्रसाद हाताळणाऱ्या सर्व व्यक्तीचे कपडे स्वछ असावे. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने साबणाने /हँड वॉशने धुवुनच कामास सुरुवात करावी. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने नाक, कान, डोके व केस खाजवणे वा डोळे चोळणे टाळावेत. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने शिंकने व थुंकणे तंबाखू वा धुम्रपान करणे टाळावे. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने प्रसाद बनविणे व हाताळण्याची कामे करु नयेत. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीची नखे व्यवस्थित कापलेली असावीत व त्यात घाण साचलेली असु नये. गणेश मंडळांनी आवश्यक तेवढाच ताजा प्रसाद विशेषत दुध व दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेला प्रसाद भक्तांना सेवनास देण्यात यावा. शिल्लक प्रसाद योग्य त्या तापमानास साठुन ठेवण्यात यावा.
कच्या अन्न पदार्थाचा टाकाऊ कचरा आणि भक्तांना कचरा टाकण्यासाठी झाकण असलेली कचरा कुंडी ठेवावी जेणेकरून आजुबाजुचा परिसर स्वच्छ राहील. प्रसाद तयार करण्यासाठीचे भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्या योग्य असावे. पिण्याचे पाणी भांडयात साठवावे, त्यावर झाकण झाकलेले असावे व पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करुन पिण्यास द्यावे. भांड्याचा वापर करण्यापूर्वी ते भांडी धुण्याच्या साबणाने/द्रावणाने घासून व पाण्याने धुवून वापरावी. भांडी कोरडी करण्यासाठी कपडयाचा वापर करावा तसेच प्रसाद तयार करणाऱ्या व्यक्तीने हात मोजे व अॅप्रॉन घालावा, तसेच केस संपुर्णपणे झाकणारी टोपी व तोंडाला मास्क घालावा.
प्रसाद हाताळणाऱ्या सर्व व्यक्तींना वैयक्तिक स्वच्छतेच्या सर्व नियमांची काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी. प्रसाद स्वत: तयार करुन भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे नोदणी करावी. नोंदणीसाठी FOSCOS.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 100 रुपये फी भरुन अन्न व औषध प्रशासन यांचेकडे नोंदणी करुन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच कच्च्या अन्न पदार्थाची खरेदी बिले बाळगावीत व कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक दुकानातूनच खरेदी करावीत, असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नांदेड यांनी प्रसिद्धी प्रत्रकाद्वारे केले आहे.
