नांदेड-आजच्या जागतिकीकरणाच्या युगात संवादकौशल्यांचे वाढते महत्त्व आणि नवमाध्यमांमधील सर्जनशील लेखनाच्या व्यावसायिक संधी लक्षात घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलामार्फत २८-३० ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डी. डी. पवार यांनी दिली.
प्रभावी संवादकौशल्ये ही आधुनिक युगातील प्रत्येक क्षेत्रासाठी आवश्यक ठरत आहेत. स्पष्ट, प्रभावी आणि विश्वासार्ह संवादाच्या माध्यमातूनच व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर रोजगाराच्या संधींनाही चालना मिळते. हाच दृष्टीकोन ठेवून या कार्यशाळेत व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच, चित्रपट, नाट्यक्षेत्र, ओटीटी प्लॅटफॉर्म, सामाजिक माध्यमे, दूरदर्शन तसेच मालिकांसाठी पटकथा, संवादलेखन आणि गीतलेखन यांचे वाढते महत्त्व लक्षात घेता, सर्जनशील लेखनाची क्षमता वाढविणे हादेखील या कार्यशाळेचा उद्देश आहे.
पीएम-उषा या योजनेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेत राज्यभरातील निवडक ५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेच्या निमंत्रक प्रा. शैलजा वाडीकर असून प्रा. मुस्तजीब खान (छत्रपती संभाजीनगर), प्रा. आनंद कुलकर्णी (पुणे), प्रा. उत्तम पाटील (कोल्हापूर), प्रा. जयश्री आहेर (अंबिकानगर), प्रा. विजय ठाणगे (कोपरगाव) आणि प्रा. ज्ञानेश्वर सूर्यवंशी (छत्रपती संभाजीनगर) हे प्रख्यात अभ्यासक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती अभ्यास संकुलाचे संचालक प्रा. दिलीप चव्हाण यांनी दिली.
